आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाच्या देशपातळीवरील शुभारंभाच्या निमित्ताने भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुपचंद्र पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे येथे मतदार जनजागृती सायकल फेरीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी निवडणुक आयोगाचे विशेष अधिकारी डॉ.रणबीर सिंग, निवडणूक उपायुक्त हृदयेश कुमार, महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, दिग्दर्शक नागराज मंजुळे, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या अंजली भागवत, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, निवडणूक आयोगाच्या माध्यम व संवाद महासंचालक शेफाली शरण, स्वीप संचालक संतोष अजमेरा आदी उपस्थित होते.
मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, देशाच्या प्रत्येक भागातील प्रत्येक पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी झाली पाहिजे. लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदानही आवश्यक आहे. शहरी भागात मतदार नोंदणीचे प्रमाण कमी असल्याने त्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा देशपातळीवरील शुभारंभ पुण्यातून होत आहे.
देशातील दुर्गम भाग, वाळवंट, समुद्रकिनारा, दऱ्याखोऱ्यातील नागरिक मतदानात सहभाग घेतात हे आपले वैशिष्ठ्य आहे. देशात वयाची शंभरी ओलांडलेले 2 लाख 489 हजार मतदार आहेत. हिमाचल प्रदेशच्या शामशरण नेगी यांनी मृत्यूपूर्वी 3 दिवस आधी टपाली मतदान केले. मतदानाविषयी ही जागरूकता आणण्यासाठी सर्वांनी मतदार जागृतीच्या कार्यात सहभागी व्हावे, निवडणुकीत मतदानाचा हक्कही बजावावा आणि निवडणूक आयोगाचे दूत म्हणून कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
निवडणुक आयुक्त पांडे म्हणाले, या वेळेचा मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम युवा मतदार केंद्रीत ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत 17 वर्षाचा युवकही नोंदणी करू शकणार आहे.18 वर्ष पूर्ण होताच त्याचा समावेश मतदार यादीत केला जाईल. लोकशाही सशक्त करण्यासाठी सर्वांनी मतदार नोंदणी करावी आणि सायकलच्या चाकाच्या गतीप्रमाणे मतदार जनजागृतीचा संदेश प्रत्येक भागात पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
मंजुळे यांनी सायकल फेरीला शुभेच्छा देताना युवा मतदारांना मतदार नोंदणीचे आवाहन केले. प्रत्येकाने मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे असे ते म्हणाले.
यावेळी दिलेल्या संदेशात मुख्य निवडणूक अधिकारी देशपांडे म्हणाले, शहरी भागातील 17 वर्षे पूर्ण झालेल्या युवकांनी मतदार म्हणून नोंदणी करुन मतदान प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी करुन घेणे तसेच मतदार यादीचे शुद्धीकरण करणे या दुहेरी उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक गावात 10 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करुन मतदार यादीचे वाचन, नवीन मतदारांची नोंदणी करण्यात येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.