आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या मार्च महिन्यापासून शाळा-महाविद्यालये बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. ऑनलाइन शिक्षणाकरिता शाळकरी मुलांचा हातात अधिकृतपणे मोबाइल वापर सुरू झाला. परंतु शिक्षणाशिवाय इतर गोष्टींकरिता मोबाइलचा अतिवापर मुलांकडून सुरू झाला असून त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या भवितव्यावर होऊ लागल्याची चिंता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
खुनाच्या तपासातून समोर आली चिंता
पुण्यातील कोथरूड भागात १३ वर्षांच्या मुलाने ११ वर्षांच्या मुलाचा किरकोळ वादातून खून केला. या तपासादरम्यान संबंधित मुलाने ‘दृश्यम’ चित्रपट मोबाइलवर डाऊनलोड करून वारंवार पाहत पुरावा नष्ट करणे आणि पोलिसांची तपासात दिशाभूल करणे या गोष्टी शिकून त्याप्रमाणे कृती केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत पोलिसांनी अभ्यास केला असता मोबाइलचा अतिवापर आणि झटपट प्रसिद्धी मिळवणे याकरिता मुले भविष्याची चिंता न करता कोणत्याही थरास जाण्यास तयार असल्याचे दिसून येत आहे.
शाळा बरेच दिवस बंद असल्याने मुलाना घराजवळ राहणाऱ्या टपोऱ्या मुलांचे आकर्षण वाढल्याचे प्रकर्षाने जाणवत असून मोबाइलमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे मुलांच्या मनावर चुकीचा परिणाम होत आहे. अल्पवयीन वयात गुन्हेगारीबद्दल प्रचंड आकर्षण वाटणे आणि तशा पद्धतीने दैनंदिन जीवन पद्धती मुले बदलत असल्याचे दिसून येत आहे.
पालकांनी मुलांकडे लक्ष देणे आवश्यक : सहा. पोलिस आयुक्त
सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख म्हणाले, शहरात पालक नोकरीकरिता घराबाहेर पडत असल्याने मुलांच्या मोबाइल वापरावर कुणाचे नियंत्रण राहत नाही. मुले नेमके काय पाहतात, कशी वागतात, त्यांचे मित्र कोण याबाबत पालकांनी सजग राहिले पाहिजे.
मुलांत चिडचिडेपणा, भीती वाढली
मानसोपचार तज्ञ चेतन दिवाण यांनी सांगितले की, लॉकडाऊनपासून मुलांमध्ये मोबाइलचा वापर प्रचंड वाढला असून स्क्रिनिंग वेळ वाढल्याचे दिसून येत आहे. ऑनलाईन शाळामुळे मुलांची शाळेची शिस्त, दैनंदिन वेळापत्रक बिघडले असून त्यांच्यात चिडचिडेपणा, भीती वाढत आहे. मोबाइलमुळे मुलांचे डोळे, डोके, मानसिक शांतता यावर परिणाम होत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.