आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअष्टविनायक यात्रा हा भाविकांचा प्राधान्यक्रम असतो. महाराष्ट्रात अष्टविनायक दर्शनासाठी वर्षभर भाविकांची गर्दी असते. या पार्श्वभूमीवर, अष्टविनायकांपैकी ओझर देवस्थानच्या वतीने ओझर येथील विघ्नेश्वर मंदिराच्या पाठीमागे देवस्थानच्या वतीने सुंदर उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. या वैशिष्ट्यपूर्ण उद्यानाचे उद्घाटन शुक्रवारी होणार आहे.
ओझर देवस्थान पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात वसले आहे. पुण्यापासून सुमारे 85 किलोमीटर अंतरावर पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव फाट्याजवळ ओझर आहे. कुकडी नदीच्या परिसरात वसलेल्या या देवस्थानच्या विश्वस्तांनी येणार्या भाविकांच्या सोयीसाठी या उद्यानाची निर्मिती केली आहे.
ओझर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे म्हणाले, 'ओझर देवस्थान मंदिराच्या मागील जागा मोकळी होती. त्या जागेत उत्तम उद्यान विकसित करता येईल, अशी कल्पना विश्वस्तांनी मांडल्यावर ती मंजूर होऊन लगेच कार्यवाही सुरू झाली आणि दीड एकर परिसरात उद्यानाची निर्मिती करण्यात आली. उद्यानात भरपूर हिरवळ (लाॅन्स) करण्यात आली आहे. भाविकांच्या सोयीसाठी आसने ठेवण्यात आली आहेत. छोट्या मुलांसाठी झोके, घसरगुंडी अशी खेळणी उभारली आहेत. उद्यानात नव्या काळाला अनुसरून दोन सेल्फी पाॅईंट देखिल करण्यात आले आहेत,'.
'श्रीगणेशाला 21 पत्री अर्पण करण्याची परंपरा आहे. त्यामुळे उद्यानात 21 पत्रींची खास लागवड करण्यात आली आहे. औषधी वनस्पती लावण्यात आल्या आहेत. शिवाय फुलझाडेही आहेत. उद्यानात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. रात्री उद्यानाचे रूप या रोषणाईमुळे खुलून दिसत आहे, ' अशी माहितीही कवडे यांनी दिली. या उद्यानाच्या निर्मितीमुळे ओझर देवस्थान परिसर अधिक शोभिवंत दिसत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.