आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाटक:प्रथमच ऑनलाईन रंगमंचावर प्रयोग; ‘मोगरा’ पोहोचतोय शेकडो रसिकांपर्यंत

जयश्री बोकील | पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गौरी देशपांडे
  • औरंगाबादकर गौरी देशपांडेने साकारली आहे महत्त्वाची भूमिका

कोरोना संसर्गाच्या संकटामुळे गेल्या पाच महिन्यांपासून सांस्कृतिक क्षेत्र सुने झाले आहे. चित्रपट, रंगभूमी आणि छोटा पडदा बंद आहेत. मात्र रंगभूमी सारखे जिवंत माध्यम, रसिकांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय शक्य नाही, हा समज बाजूला ठेवणारे ‘मोगरा’ या ‘नेटक’चे (ऑनलाइन नाटक ) प्रयोग प्रथमच शेकडो रसिकांपर्यंत पोहोचत आहेत आणि या आगळ्यावेगळ्या ऑनलाइन ‘प्रयोगा’तील महत्त्वाची भूमिका औरंगाबादकर अभिनेत्री गौरी देशपांडे साकारत आहे.

दिव्य मराठीसोबत संवाद साधताना गौरी म्हणाली,‘२०२० साली होणारे नाट्यसंमेलन शतक महोत्सवी होते. त्यानिमित्त होणाऱ्या नाटकासाठी माझी निवड झाली होती. तालमीही सुरू होत्या. पण मार्चपासून कोरोनाचे संकट उद््भवल्याने लॉकडाऊन सुरू झाला. संमेलन पुढे गेले. अशा काळात एक दिवस मला प्रसिद्ध कलाकार, दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी एका वेगळ्या प्रयोगात काम करणार का, असे विचारले. मी लगेच होकार दिला आणि ‘मोगरा’च्या टीममधली सर्वांत ज्युनिअर सदस्य म्हणून या प्रयोगात सामील झाले. तेजस रानडे यांनी संहितेची बांधणीच अशी केली होती, की त्याचे सादरीकरण ऑनलाईन व्यासपीठावर शक्य व्हावे. ऋषिकेश जोशी यांनी गुणवंत तंत्रकुशल टीम एकत्र केली, आणि ‘मोगरा’ व्हर्च्युअली साकार झाले. वंदना गुप्ते, भार्गवी चिरमुले, स्पृहा जोशी, मयुरा पलांडे आणि मी, अशा पाच स्त्री कथा ‘मोगरा’मध्ये प्रेक्षकांसमोर येतात. प्रत्येकीची वेगळी कहाणी आणि वेगळे भान ‘जागे’ होण्याचा प्रवास ‘मोगरा’मधून पुढे येतो.

‘मी स्वानंदी नावाची व्यक्तिरेखा साकारते. १९४७ च्या सुमारासची तरुण मुलगी, तिचे भावविश्व, तिच्या अडचणी..यातून घडणाऱ्या संघर्षकथा. त्या स्त्रियांचे धाडस, समज, प्रगल्भता..यातून पुढे येते आणि एक वेगळी दृष्टी देते. आम्ही सर्वजण आपापल्या घरात एका खोलीत दोन कॅमेऱ्यांच्या समोर हे सादर करतो. इथे कॅमेऱ्याची फ्रेम हाच आमचा रंगमंच आहे. बाकी वेषभूषा, रंगभूषा, प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत, नेपथ्य..सारं आहे. आमची खोली हा आमचा सेट असतो. इथे उणीव असते ती प्रेक्षकांच्या जिवंत प्रतिसादाची. ती आम्ही सगळेच मिस करतोय, पण आजवर झालेल्या २२ -२३ प्रयोगांचा अनुभव खूप शिकवणारा आणि समृद्ध करणारा आहे, ” असे गौरीने सांगितले.

रंगभूमीला पर्याय नाही

टीममधले इतर सर्वजण अनुभवी आणि मुरलेले आहेत. मी त्या तुलनेने नवीन अननुभवी असले, तरी सर्वजण मला सांभाळून घेतात. प्रयोगानंतर मिळणारा प्रतिसाद उमेद वाढवणारा असतो. कॅमेऱ्यासमोर काम करायचे असल्याने चेहऱ्यावरील भावदर्शन, देहबोली, नजरेतून व्यक्त होणे..हे शिकता आले. मात्र रंगभूमीला हा पर्याय नाही, हे सर्वांत महत्त्वाचे आहे. - गौरी देशपांडे, अभिनेत्री