आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:गंभीर रुग्णांसाठी “दगडूशेठ’ गणपतीच्या ऑनलाइन दर्शनाची सोय

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विविध आजारांशी झुंज देणारे रुग्ण परमेश्वराकडे आपण लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतात. ऐन गणेशोत्सवात आपण गणरायासमोर जाऊन नतमस्तक व्हावे, अशी इच्छा सामान्यांप्रमाणे या रुग्णांचीही असते. मात्र, आजारपणामुळे त्यांना रुग्णालयातून कोठेही जाता येत नाही. मात्र, दगडूशेठ गणपतीने अशा रुग्णांसाठी रुग्णालयातून ऑनलाइन दर्शनाची सोय केली आहे. यामुळे या रुग्णांना आपण प्रत्यक्षात उत्सव मंडपात जाऊन दर्शन घेत असल्याचा भास होत आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे १३० व्या वर्षी गणेशोत्सवात हा अनोखा उपक्रम राबवण्यात येत आहे. ऑगमेंटेड आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी स्टार्टअप - डिजिटल आर्ट व्हीआरई यांनी या उपक्रमासाठी सहकार्य केले आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयातील आयसीयूमधील रुग्णांना हे दर्शन घडवण्यापासून या उपक्रमाला प्रारंभ झाला. ससून रुग्णालयातील रुग्णांना बाप्पाचे या माध्यमातून दर्शन घेताना आनंदाश्रू अनावर झाले. ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, पुणे शहरातील १५ रुग्णालयांमधील अंदाजे ५०० रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा ट्रस्टचा मानस आहे. याबाबत संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांच्या विशेष परवानग्या घेतल्या आहेत, ज्यांनी आम्हाला उत्सवाच्या या दहा दिवसांमध्ये हा अनुभव देण्यास अनुमती दिली आहे. यामुळे रुग्णांना वेगळी ऊर्जा व समाधान मिळणार असून बाप्पाचा हा दर्शनरूपी प्रसाद, ट्रस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. कोविडमुळे निर्माण झालेले भय व नैराश्य दूर होऊन या माध्यमातून रुग्णांचे मनोबल वाढण्यास मदत होईल.

आजोबांनी घेतले दर्शन
ससूनमध्ये उपचार घेणारे पनवेलचे ८७ वर्षांचे रुग्ण प्रभाकर डिंगोरकर म्हणाले, उद्याची चिंता, नकारात्मकता आमच्यासारख्या रुग्णांमध्ये नेहमी असते. मात्र, आज सकल विघ्नहर्ता गणरायाचे दर्शन झाले. जेव्हा मला भगवंताचे दर्शन झाले आणि आरती, सजावट पाहायला मिळाली, त्यावेळी नकळत अशी ऊर्जा आली. यामुळे मी लवकर बरा होईन आणि मला लवकर घरी जाता येईल. असे नवनवीन प्रयोग ट्रस्टने आम्हा रुग्णांसाठी राबवावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

बसून पाहण्याची सोय
डिजिटल आर्ट व्हीआरईचे संस्थापक संचालक अजय पारगे म्हणाले, गणपती बाप्पा मेटाव्हर्समध्ये असतील आणि आरोग्याच्या स्थितीनुसार काही रुग्ण आभासी माध्यमाद्वारे बाप्पासमोर उभे राहून आरती करू शकतील. हे रुग्ण इतर भक्तांच्या शेजारी उभे राहून जप करताना आणि अभिषेक करतानाही पाहतील. त्यामुळे त्यांना बसल्या जागी बाप्पासाठी केलेली सजावट व प्रत्यक्ष दर्शन घेण्याचा अनुभव मिळणार आहे.

बातम्या आणखी आहेत...