आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक भरती घोटाळा प्रकरण:पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल, दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी टाकले होते शहरात छापे

पुणे6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच आर्थिक गुन्हे शाखेने एका शिक्षक संघटनेचा पदाधिकारी व इतर ठिकाणी छापे टाकले होते.

शिक्षण विभागातर्फे राजेंद्र बाबासाहेब साठे (४६ ,रा.शनिवार पेठ,पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार सुबोध शिक्षण संस्थेचे सचिव गैरव अशोक कदम, शिक्षक संघटनेचा पदाधिकारी संभाजी सुभाष शिरसाट तसेच तात्कालिन वेतन पथक अधिक्षक व भविष्य निर्वाह निधी पथक (प्राथमिक) यांच्या विरुध्द फसवणुकीसह इतर कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फिर्यादीनूसार सुबोध शिक्षण संस्थेचे सचिव गौरव कदम व शिक्षक संघटनेचा पदाधिकारी संभाजी शिरसाट यांनी लिपिक व शिपाई यांच्या खोट्या व बनावट मान्यता तयार करून त्या खऱ्या आहेत असे भासवून जून २०१६ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीची वेतन देयके वेतने पथक प्राथमिक यांच्याकडे सादर केली. वेतनापोटी १ लाख ४६ हजार रुपयांची शासनाची फसवणूक केली. याप्रकणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे आर.व्ही.सहाणे करत आहेत.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच शिक्षक भरतीसाठी खोटी कागदपत्रे तयार करत अधिकाऱ्यांशी संगनमत करून लाखो रुपयांचे व्यवहार केल्याप्रकरणी शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेने पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सहा ठिकाणी छापे टाकून महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती राज्यभरात पसरली असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिस त्यादृष्टीनेही तपास करत असल्याचे सांगण्यात येत असून याप्रकरणी धागेदारे हाती लागण्याची शक्यता आहे.

चार हजार ११ प्रकरणांची चौकशी सुरू
शिक्षकांच्या बनावट मान्यता तयार करून त्यांना वेतन सुरू करण्याचे प्रकरण उजेडात आणले होते. त्यानंतर राज्यभरातील शिक्षक भरतीची चौकशी सुरू झाली. पुण्यातील जिल्हा परिषदेच्या भरतीबाबतही चौकशी करण्यात आली. सर्वसाधारण सभेत हा विषय चर्चेला आला होता. त्यानंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. तसेच ४ हजार ११ प्रकरणांची चौकशी देखील अद्याप सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...