आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची लंडनमधील बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्याबाबत सीबीआयने मागणी केली होती. आता त्यांच्या पुण्यातील बाणेर येथे असलेल्या बंगल्यावरील हेलिकॉप्टर सीबीआयने जप्त केले आहे. यामुळे भोसले कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
बेहिशेबी संपत्तीचा शोध
अविनाश भोसले हे पुण्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक आहेत. पुण्यात एबीएचएल नावाने त्यांचे भोसले नगर परिसरात आलिशान ऑफिसही आहे. त्यांचा विविध पक्षातील अनेक राजकीय व्यक्तींशीही संबंध आहे. मात्र, येस बँक आणि डीएचएफएल घोटाळाप्रकरणी भोसले हे सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत. त्यांच्या अनेक बेहिशेबी संपत्तीचा शोध सीबीआयमार्फत घेतला जात आहे.
हेलिकॉप्टरचा निवडणुकीत वापर
अविनाश भोसले हे बाणेर येथील प्रशस्त बंगल्यात कुटुंबासह राहतात. येथेही सीबीआयने छापे टाकले आहेत. येथे बंगल्यावरच हेलिकॉप्टरसाठी अविनाश भोसले यांनी हेलिपॅड बनवले असून ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीचे हे हेलिकॉप्टर आहे. राज्यभरातील अनेक राजकीय व्यक्तींनी निवडणूक काळात या हेलिकॉप्टरचा वापर केला आहे. सीबीआयने शनिवारी केलेल्या कारवाईत हे हेलिकॉप्टर जप्त केले, अशी माहिती एएनआयने दिली. या पूर्वीही अविनाश भोसले यांच्या संपत्तीवर टाच आणण्यात आली होती.
कोट्यवधींचे कर्ज थकवले
डीएचएफएलचे माजी प्रमुख कपिल वाधवान, दीपक वाधवान यांच्याविरोधात सीबीआयने २० जून रोजी आरोपपत्र दाखल केले आहे. येस बँक आणि डीएचएफएल प्रकरणात भोसले यांनी जवळपास ३४ हजार ६१५ कोटी रुपयांचा घोटाळा केला असून यात १७ बँकेकडून त्यांनी बेहिशेबी कर्ज घेतले. यात युनियन बँक ऑफ इंडियाचाही समावेश आहे. या बॅकांकडून कर्ज म्हणून मिळालेली रक्कम अविनाश भोसलेंनी अनेक शेल कंपन्यांत गुंतवली, असा त्यांच्यावर आरोप आहे.
सीबीआयचा दावा
भोसले यांना वाधवान यांनी सुमारे ३०० कोटी रुपये दिले होती. त्यातून भोसले यांनी लंडन येथील मालमत्ता खरेदी केली. तसेच एबीआयएल कंपनीला ४३ कोटी आणि मेट्रोपोलिस हाॅटेल कंपनीला १४० कोटी रुपये कर्ज म्हणून दिल्याचे दाखवले होते. प्रत्यक्षात ही रक्कम कर्ज नव्हती तर दलाली होती, असा दावाही सीबीआयने केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.