आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Farewell To Bappa In Punyanagar In Disciplined Padnyasa; Devotees Along With The Police Were Also Wrong In Their Predictions | Marathi News

विसर्जन:शिस्तबद्ध पदन्यासात पुण्यनगरीत बाप्पांना निरोप ; पोलिसांसह भाविकांचेही अंदाज चुकले

पुणे19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ढोलताशांचा अखंड नाद, शिस्तबद्ध पदन्यास करत घुमणाऱ्या टिपऱ्या, शंखांचे मंगलध्वनी, आकर्षक रथ, सजवलेली मंदिरे, काळोखाला भेदणारी विद्युत रोषणाई, पारंपरिक पोषाखातील भाविकांचा जनसागर...आणि या साऱ्या वातावरणाला अधिकच खुलवणारा मोरया मोरया हा जयघोष...अशा वातावरणात पुण्यनगरीतील वैभवशाली गणेश विसर्जन सोहळा शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता सुरू झाला.दोन वर्षांनंतर ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाला निर्बंधमुक्त मिरवणूक साजरी करण्याची मोकळीक मिळाल्याने अपेक्षेनुसार यंदाची मिरवणूक लांबणार, याची चुणूक सुरुवातीच्या मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीतच मिळाली होती. मानाचा पाचवा गणपती केसरीवाडा मंडळाच्या गणेश विसर्जनासाठी रात्रीचे तब्बल ९.३० वाजले. त्यानंतर मिरवणूक संथ गतीने सरकत राहिली.

दगडूशेठ, मंडई मंडळांना अतिविलंब अमोघ त्रिशक्ती नाग रथामध्ये विराजमान अखिल मंडई मंडळाचे शारदा गजानन आणि श्री स्वानंदेश रथामध्ये विराजमान श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती या दोन गणपतींचे दर्शन गणेशभक्तांना शनिवारी सूर्योदयाच्या समयी झाले. उजाडल्यानंतर हे दोन्ही रथ बेलबाग चौकातून विसर्जनासाठी मार्गस्थ झाले. या मंडळांनी साकारलेली सजावट पाहून गणेशभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट हे विद्युत रोषणाईच्या श्री गणेशांचे दर्शन घेण्यासाठी ताटकळावे लागले.

फुलांनी सजला रंगारी ट्रस्टचा गणपती
आकर्षक फुलांनी सजलेला पारंपरिक रथ, त्यावर साकारलेला रणशिंग पुष्प चौघडा, रथावर कोल्ड फायरची विद्युत आतषबाजी, मर्दानी खेळांसह ढोल-ताशाचा दणदणाट अशा लक्षवेधक मिरवणुकीने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या गणपतीचे विसर्जन झाले. श्रीराम, नादब्रह्म, सर्ववादक, समर्थ प्रतिष्ठान अशी ढोल-ताशा पथके मिरवणुकीच्या अग्रभागी होती. सकाळी नऊ वाजता या गणपतीचे विसर्जन झाले. गरूड गणपती आणि गजानन मंडळ या दोन मंडळांचे गणपतींची एकत्रित मिरवणूक काढण्यात आली.

कलेच्या राजाला केले अभिवादन
पुणे शहरात कलेचा राजा म्हणजेच राजा रवी वर्मा यांना अभिवादन करणारा रथ जिलब्या मारुती मंडळाने साकारला होता. तर, प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी साकारलेल्या काल्पनिक रथामध्ये हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा गणपती विराजमान झाला होता. प्रत्येकी तीन ढोल-ताशा पथकांतील कालाकारांच्या वादनामुळे या दोन्ही मंडळांचे गणपती मिरवणुकीत दाखल होण्यास विलंब झाला. त्यामुळे त्यामागील सर्वच रथ उशिरा चालत राहिले.

शारदा गजाननाची मिरवणूक पहाटेला
अमोघ त्रिशक्ती नाग रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक पहाटे चार वाजता सुरू झाली. हा रथ साडेसहा वाजता बेलबाग चौकामध्ये आला. रथावरील ब्रम्हा, विष्णू व महेशाच्या त्रिमूर्ती गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेत होत्या. रथामध्ये नागाच्या वेटोळ्यामध्ये शारदा गजानन विराजमान झाले होते. मिरवणुकीमध्ये जयंत नगरकर यांचा सनई-चौघड्याचा गाडा, गंधर्व बँड तसेच शिवगर्जना वाद्य पथकासह दोन ढोल-ताशा पथके सहभागी झाली होती.

बातम्या आणखी आहेत...