आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्री झाले चिंताक्रांत:ठाकरे सरकार पडण्याच्या भीतीने मंत्र्यांची घालमेल वाढली; फाइली क्लिअर करण्यासाठी मंत्रालय फुल्ल

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे राज्यात घडामोडींना वेग आलेला असून, पुण्यासह राज्यातील भांडवलदार, ठेकेदार, व्यावसायिक, उद्योजक यांची चिंता वाढली आहे. मंत्र्यांनी आपल्या फाइली क्लिअर करण्यासाठी मंत्रायलाय गर्दी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार याची चर्चा सुरूय. त्यामुळे अन्य महत्त्वाच्या विषयांवरील मंत्रालयातील फाइल्स तसेच अन्य अर्ज याचे काम करून घेण्याकरता गेल्या दोन दिवसांत पळापळ वाढली आहे. शहरातील अनेक जण मुंबईच्या वाऱ्या करत आहेत तर काही जणांनी मंत्रालयाशेजारीच मुक्काम ठोकले आहे.

अधिकाऱ्यांची धावपळ

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार धोक्‍यात आल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. यापार्श्‍वभूमीवर मंत्रालयात प्रस्तावांच्या फाइलींवर सह्या होण्यासाठी संबंधितांनी तळ ठोकला आहे. विशेष म्हणजे अशा फायलींवर सही होण्यासाठी कित्येक दिवस लागणार असताना सत्तांतर होणार असल्याने मंत्रालयात प्रस्तांच्या फाइलींवर सह्या घेणे, अर्ज निकाली काढणे, अशा कामांना गेल्या दोन दिवसांत मोठा वेग आला आहे. मंत्रालयातील कामांच्या मंजुरीसाठी टेबलांवर ढिगात फाइल्स पडून असल्याचे चित्र असतानाच आपल फाइल काढून त्यावर सही घेऊन ते फायनल करण्यासाठी संबंधीतांची धावपळ उडाली आहे. यातून प्रत्येक विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताणही वाढला आहे.

मंत्री झाले चिंताक्रांत

शिवसेनेतील पडलेल्या फुटीमुळे महाविकास आघाडीतील मंत्रीही चिंताक्रांत झाले आहेत. त्यामुळे प्रस्तावांच्या फाइल क्‍लिअर करण्याच्या कामाला वेग आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच, मंत्री कार्यालयातही धावपळ वाढली आहे. त्याचवेळी मंत्री कार्यालयांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही पुन्हा मूळ विभागात जावे लागू शकते म्हणून चिंता वाढली आहे. तसेच, काही विभागात तर कर्मचारी कित्येक तास थांबून फाइल्स क्‍लेअर करण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, बुधवार पासून मंत्रालयातील गर्दीत दिवसागणिक मोठी वाढ होत असल्याने दिवसभर मंत्रालयातील अनेक विभागांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे.

बदल्यांचे पैसे अडकले?

राज्यातील विविध विभागात कार्यरत असणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी वेगवेगळ्या पदांवरील बदल्यांसाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग केले होते. याकरीता संबंधित व्यक्तींकडून ठरावीक पैसे आगाऊ घेण्यात आलेले आहे, तर काहीजणांना कामे होतील असे आश्वासित करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी बदल्यांसाठी पैसे भरले आहेत त्यांची चिंता वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. अनेक जण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना फोन करून ऑर्डर लवकर काढण्याची सातत्याने विनवणी करत आहेत. मात्र, सरकार ज्याप्रकारे अस्थिर होत चालले आहे तशी बदल्यांसाठी तयारी केलेल्या लोकांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येत आहे.