आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावीचा निकाल वेळेत जाहीर होण्याचे संकेत:बारावी पेपर तपासणीवरील बहिष्कार महासंघाकडून मागे

पुणे24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर घातलेला बहिष्कार गुरुवारी मागे घेतला आहे. त्यामुळे यंदाचा बारावीचा निकाल वेळेत जाहीर होण्याचे संकेत मिळाले आहेत. महासंघाच्या अनेक मागण्या प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक-प्राध्यापकांनी महासंघामार्फत आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे बारावीचे निम्मे पेपर झाल्यानंतरही पेपर तपासणीला सुरुवात होऊ शकली नव्हती. त्याबाबत पुण्यात मंडळाच्या अधिकाऱ्याबरोबर झालेली बैठक निष्फळ ठरली होती.

त्यानंतर विभागवार घेण्यात आलेल्या बैठकीतदेखील कुठलाही तोडगा निघाला नव्हता. अखेर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि शिक्षण मंडळातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत गुरुवारी झालेल्या बैठकीत महासंघाच्या महत्त्वाच्या मागण्या मान्य करण्यात आल्याने बहिष्कार आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महासंघाने जाहीर केले. इतर मागण्यांबाबत अधिवेशनानंतर बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

अशा आहेत प्रमुख मागण्या { १ नोव्हेंबर २००५ पूर्वी सेवेत असलेल्या विनाअनुदानित, अंशत: अनुदानित, अर्धवेळ शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी समिती नेमण्यात येऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल. { १०-२०-३० वर्षांनंतरची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात येईल. त्याबाबतचा प्रस्ताव वित्त विभागाकडे आजच सादर करण्यात आला. { २१४ व्यपगत पदांना उच्चस्तरीय सचिव समितीने मंजुरी दिली असून त्याबाबतचा शासन आदेश १५ दिवसांत निर्गमित करण्यात येईल, तर उर्वरित कार्यरत असलेल्या वाढीव पदावरील शिक्षकांना अधिवेशन काळातच उच्चस्तरीय सचिव समितीची बैठक आयोजित करून मान्यता देण्यात येईल. { आयटी विषय नियुक्ती मान्यताप्राप्त शिक्षकांना अनुदानित पदमान्यता व वेतनश्रेणी लागू करण्याबाबत वित्त विभागाकडे पुढील १५ दिवसांत प्रस्ताव सादर केला जाईल. { अनुदानासाठीच्या जाचक अटी रद्द करण्याबाबत महासंघाने आवश्यक त्या सुधारणा शिक्षण विभागाकडे सादर कराव्यात.

बातम्या आणखी आहेत...