आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रंथ व्यवसायाचे कोट्यवधींचे नुकसान:पाचशे मराठी पुस्तकांच्या पीडीएफ करणाऱ्या  टोळीविरोधात गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठीतील गाजलेल्या पाचशे पुस्तकांच्या बेकायदेशीर पीडीएफ तयार करून मराठी ग्रंथ व्यवसायाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान करणाऱ्या टोळी विरुद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी जुहू पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवला असून जुहू पोलिसांनी त्या गुन्ह्याची नोंद करून रीतसर तपासाला सुरुवात केली आहे.मराठीतील वि स खांडेकर, रणजित देसाई, शिवाजी सावंत, पु ल देशपांडे, विश्वास पाटील, अब्दुल कलाम तसेच विश्वास नांगरे पाटील आदींच्या गाजलेल्या पुस्तकांचे पीडीएफ तयार करून ती फुकटात वितरित करणाऱ्या काही टोळ्या निर्माण झाले आहेत.

प्राथमिक पाहणीत हे गुन्हेगार राजस्थान, मुंबई, नागपूर व पुणे आदी ठिकाणाहून काम करतात. गैरकायदेशीर पीडीएफ तयार करणे, ते व्हाट्सअप ग्रुपवर बेकायदेशीररित्या वितरित करणे, तसेच पायरेटेड पुस्तके छापणे हा या टोळीचा उद्योग आहे. त्यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांनीही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे याआधीच रीतसर तक्रार केलेली आहे. आता विश्वास पाटील यानी कॉपीराईट अॅक्ट 1957 खाली केलेल्या तक्रारीवर जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यासाठी गुन्हेगारास सात वर्षे शिक्षेची तरतूद आहे.

आता तपास यंत्रणांनी हे पीडीएफ कोणकोणत्या व्हाट्सअप ग्रुपवर वितरित झाले. ते वितरित करण्यासाठी कोणत्या कोणत्या नंबरवरून गुन्हेगारी स्वरुपाचे कृत्य घडले याचा तपास सुरू केला आहे .काही ग्रुप हे परदेशातून असे गैरकृत्य करतात. परंतु त्या त्या देशातील भारतीय वकिलाती मार्फत त्या गुन्हेगारांचा शोध घेऊन तयाना कायद्याच्या कचाट्यात आणले जाऊ शकते. या पीडीएफखोरांमुळे मराठी प्रकाशन व्यवसायाचे नुकसान होत आहेच. परंतु अनेक पीडीएफ हया निकृष्ट स्वरूपाचे असल्याने वाचकांची ही फसवणूक केली जात आहे.

विशेषता रणजित देसाई, शिवाजी सावंत व विश्वास पाटील यांच्या इंग्रजीत भाषांतरित झालेल्या पुस्तकांच्या सुद्धा काही महाभागांनी पीडीएफ केले आहेत. त्यातील बरेचसे धागेदोरे हाती लागत असून नजीकच्या काळात मोठ्या प्रमाणावर कारवाई होऊ शकते .तरी सामान्य वाचकांनी या गैरकृत्य करणाऱ्या मंडळींकडूनपासून सावध राहावे ही विनंती.

बातम्या आणखी आहेत...