आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौटुंबिक वाद:आधी बालकाचा खून केला, नंतर 20 कोटींच्या खंडणीची मागणी ; दोघांना अटक

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीबरोबर असणारे कौटुंबिक वाद, एकतर्फी प्रेमास विरोध आणि २० कोटींच्या खंडणीसाठी दोघांनी एका व्यावसायिकाच्या सात वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरीतील मासूळकर कॉलनीतील ग्रीनफील्ड सोसायटीत ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी २४ तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. खंडणी मागणाऱ्यांनी खून केल्याचे भासवण्याचा आरोपींचा प्रयत्न होता. परंतु पोलिसांनी मारेकऱ्यांनी खंडणीसाठी पाठवलेल्या मेसेजचे तांत्रिक विश्लेषण करत त्यांच्या मुसक्या आवळल्या.

आदित्य गजानन ओगले (७) असे मृत मुलाचे नाव आहे. मंथन किरण भोसले (२०, रा. पिंपरी) आणि अनिकेत श्रीकृष्ण समदर (२१, रा. चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मुलाचे वडील गजानन ओगले (४९ पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले, आठ सप्टेंबर रोजी सायंकाळी दाेन्ही आरोपी एका चारचाकी वाहनातून सोसायटीच्या कम्पाउंडमध्ये आले. त्यांनी आदित्य कपाउंडमध्ये खेळायला येण्याची वाट पाहिली. त्यानंतर अनिकेतने ‘तुझी आत्या आली आहे, गाडीत बसली आहे,’ असे म्हणत आदित्यला गाडीत बोलावले. मंथनने त्याला ओढतच गाडीत बसवले. मात्र, आदित्यने आरडाओरडा सुरू केला. आरोपींनी नाक, तोंड दाबत गळा आवळत त्याचा खून केला. त्यानंतर आरोपी तेथून निघून गेले. त्याच दिवशी रात्री नऊच्या सुमारास आरोपींनी आदित्यचा मृतदेह एका प्लास्टिक पोत्यामध्ये बांधून एमआयडीसी परिसरातील टेरेसवर नेऊन टाकला. रात्री १ वाजता एका मोबाइल क्रमांकावरून मुलाच्या वडिलांना व्हॉट्सअॅप मेसेज करून २० कोटींची खंडणी मागतली. या मेसेजआधारे तांत्रिक शोध घेत पोलिसांनी आरोपींचा छडा लावला.

बदला म्हणून आदित्यचा खून : मृत आदित्यचे कुटुंब आणि आरोपी मंथनचे कुटुंब एकाच सोसायटीत राहते. त्यांचे कौटुंबिक वाद आहेत. या वादातून अनेकदा आदित्यचे वडील आणि आरोपी मंथनची भांडणे झाली होती. मंथन हा व्यसनाधीन झाल्याने त्याला ६ महिने व्यसनमुक्ती केंद्रात ठेवले होते. या गोष्टीचा बदला घेण्यासाठी मंथनने हा खून केला.

पोलिसांबरोबरच फिरत होता आरोपी मंथन
अपहरणाचा तपास करण्यासाठी पोलिस ज्या वेळेस सोसायटीत गेले, त्या वेळी आरोपी मंथन हा पोलिसांबरोबर फिरत होता. सोसायटीतील काही रहिवाशांनी मंथन आणि आदित्यच्या वडिलांचे भांडण असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मोबाइल तपासला होता. आरोपींनी चिखलीतील एका मजुराचा मोबाइल मिळवत, त्या मोबाइल क्रमांकावरून आदित्यच्या वडिलांना खंडणीसाठीचा व्हॉट्सअॅप मेसेज केला होता.

बातम्या आणखी आहेत...