आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालतादीदी ही व्यक्ती नव्हती, साक्षात ईश्वरी तत्त्वच तिच्या रूपाने मानवदेहात वावरत होते, अशी आम्हा मंगेशकर कुटुंबीयांची भावना आहे. त्यामुळे लतादीदींचे पार्थिव अस्तित्व आज नसले तरी ती आमच्यात आहेच अन् सदैव राहील. लतादीदी साधारण व्यक्ती नव्हतीच. ते अलौकिक रसायन होतं. स्वत: ईश्वरानेच तिला ‘घडवून’ पृथ्वीतलावर पाठवलं असावं.
माईनंतर दीदीच आमची आई झाली. मातेच्या ममतेनेच तिने कुटुंबातील प्रत्येकाला सांभाळले. प्रेम दिले. प्रत्येकामध्ये तिने स्वतंत्र वाट, शैली निर्माण करण्याचा आत्मविश्वास जागवला. प्रत्येकासाठी ती झटत राहिली.वर्षभरातील सण दीदी, आम्ही पारंपरिक पद्धतीने एकत्रितपणे साजरे करायचो. वर्षभर दीदीची क्षणाेक्षणी आठवण येत राहिली. ‘परोपकार’ हा तिचा स्थायीभाव होता. शक्य तिथे ती मदतीसाठी तत्पर असे आणि याविषयी अवाक्षर न काढता मदत करत राहायची. शाळकरी विद्यार्थ्यापासून ते खेळाडूंपर्यंत आणि उभरत्या गुणी कलाकारापासून शास्त्रज्ञांपर्यंत तिच्या मदतीचा पैस विस्तारलेला होता.
दीदीला अनेक आजारांनी आयुष्यभर छळले. तिच्या खाण्यावर, फिरण्यावर निर्बंध आले. पण या कशाचाही उच्चार न करता ती सोसत राहिली. उलट आपल्या शारीरिक त्रासांचा, आजारांचा ती गमतीने उल्लेख करत असे.
दीदी म्हणजे मूर्तिमंत सकारात्मकता. निराशेचे, दुर्मुखलेले क्षण ती सकारात्मक तेजाने क्षणात उजळून टाकत असे. लतादीदी म्हणजे फक्त गाणं नव्हतं. तिचं गाणं ईश्वरी होतंच, पण तिच्या व्यक्तिमत्वातले कित्येक पैलूही आम्हाला ‘ईश्वरी” वाटायचे.
त्यात दातृत्व प्राधान्याने होतं. जे आवडेल, तिच्या कलावंत मनाला पटेल आणि हृदयापासून भावेल त्या प्रत्येक गोष्टीचे, व्यक्तीचे, स्थळाचे ती रसिकतेने कौतुक करायची.
‘तसे’ गाणे कुणाचेच नाही... :
लतादीदीच्या गाण्याविषयी मी वेगळं काय सांगणार? सारं जग ते जाणतं. मला एक संस्कृत श्लोक आठवतो.
गगनं गगनाकारं, सागर: सागरोपमा
रामरावणोर्युद्धं रामरावणयोरिव
(आकाशाला फक्त आकाशाचीच उपमा आणि सागराला फक्त सागराचीच उपमा देता येते. त्याप्रमाणे राम - रावण यांच्या युद्धालाही इतर कुणाचीच उपमा लागू पडत नाही. त्यांच्यासारखे तेच) या श्लोकात म्हटल्याप्रमाणे लतादीदीच्या गाण्याला कुणाचीच उपमा देता येत नाही. तिच्यासारखी फक्त तीच होती…
कुटुंबियांसाठी सर्वकाही… :
लतादीदीने आम्हा सर्व कुटुंबियांसाठी जो त्याग आणि समर्पण केले, त्याला तोड नाही. तिने आम्हा कुटुंबियांसाठी, प्रत्येकाच्या भल्यासाठी स्वत:चे सुख प्रत्येक वेळी बाजूला ठेवले. एकटेपणा स्वीकारला. तिच्या मायेचे वर्णन करायला मला शब्द सूचत नाहीत. कोणत्याही क्षणी कुटुंबीय, हा तिचा प्राधान्यक्रम राहिला. जबाबदारीची तिची भावना पराकोटीची कृतीशील होती. ती फक्त थोरली बहीण नव्हती. ती आम्हा मंगेशकर कुटुंबियांचे सारसर्वस्व आहे आणि राहील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.