दिलासा : गुढीपाडव्याला पहिल्या रुग्ण दांपत्याला रुग्णालयातून सुटी

  • दोघे निगेटिव्ह, बरे झालेल्या तिघांचे अहवाल आज येणार

दिव्य मराठी वेब टीम

Mar 26,2020 10:06:00 AM IST

पुणे : दुबई येथे सहलीला जाऊन पुण्यात परतलेले एक दांपत्य कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे हाेळीच्या दिवशी म्हणजेच ९ मार्च रोजी पुण्यातील नायडू रुग्णालयात निष्पन्न झाले होते. १४ दिवसांचे त्यांचे विलगीकरण रविवारी पूर्ण झाल्यानंतर सोमवारी सकाळी त्यांच्या घशातील द्रव पदार्थ तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठवण्यात आले. सोमवारी रात्री त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला हाेता. त्यानंतर पुन्हा मंगळवारी सकाळी त्यांच्या स्वॅबचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठवले असता बुधवारी सकाळी त्यांचा अहवाल निगेटिव्ह अाल्याने संबंधित दांपत्यास घरी साेडणार असल्याची माहिती विभागीय अायुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.


दुबई येथे संबंधित कुटुंबीय सहलीसाठी फिरण्यास गेले होते. त्यांच्यासोबत त्यांची मुलगीही फिरण्यास गेली होती. तपासणीदरम्यान ती सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. यासोबतच सहलीतील मूळचा यवतमाळ येथील आणि सध्या पुण्यात राहणारा अन्य एक जण दांपत्याच्या संपर्कात अाल्याने तो बाधित असल्याचे स्पष्ट झाले होते. सदर कुटुंबाला मुंबई विमानतळावरून पुण्यात घेऊन आलेला खासगी कारचालक यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली होती. तिघांनाही नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून सोमवारी १४ दिवस पूर्ण झाले. त्यानंतर या तिघांच्या घशातील द्रवाचे नमुने मंगळवारी सकाळी प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात अाले असून सदर तिघांचा अहवाल निगेटिव्ह अाला अाहे. बुधवारी सकाळी पुन्हा तिघांचे नमुने घेऊन प्रयाेगशाळेत पाठविण्यात अाले असून बुधवारी रात्रीपर्यंत त्याचा अहवाल निगेटिव्ह अाल्यास गुरुवारी त्यांना रुग्णालयातून घरी साेडण्यात येर्इल, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात अाली अाहे. काेराेना पाॅझिटिव्ह दांपत्याचे दाेन्ही नमुने निगेटिव्ह अाल्याने त्यांना काळजी करण्याचे कारण नसून नियमाप्रमाणे त्यांना कोरोना निगेटिव्ह घोषित करून पुढील १४ दिवस त्यांना राहत्या घरात स्वतंत्रपणे राहण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला अाहे. दरम्यान, त्यांचा मुलगा कोरोना निगेटिव्ह असून त्याला सुरक्षेच्या दृष्टीने मागील १६ दिवसांपासून नायडू रुग्णालयात ठेवले असून त्यालाही बुधवारी घरी सोडण्यात अाले.


महत्त्वाची लढाई जिंकली


राज्यातील पहिले कोरोना पॉझिटिव्ह झालेले रुग्ण ‘दिव्य मराठी’शी बोलताना म्हणाले, ज्यावेळी कोरोना झाल्याचे समजले त्यावेळी आम्हाला धक्का बसला. पण, वेळेत रुग्णालयात दाखल झाल्याने इतरांना संसर्ग झाला नाही. नायडू रुग्णालयातील सर्व डॉक्टर, नर्स यांनी चांगल्या प्रकारे अामची काळजी घेतली. शासनाने सुविधा दिल्याने आम्ही त्यांचे आभारी आहोत. अायुष्यातील महत्त्वाची लढाई आज जिंकल्याची भावना आमची असून लवकरच सामान्य नागरिकांप्रमाणे समाजात फिरू शकणार असल्याचा आनंद वाटतो. काेराेनावर मात केली जाऊ शकते. परंतु, त्याकरिता काळजी घेणे अावश्यक अाहे. कोरोनाबाबत प्रशासनने नागरिकांना दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.


पुणे विभागात ८२५ नमुने


पुणे विभागीय अायुक्त डाॅ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात एकूण ८२५ नमुने घेतले हाेते व त्यापैकी ७३७ जणांचे अहवाल प्राप्त झाले. यात ६९२ जणांचे अहवाल निगेटिव्ह अाले असून ३७ अहवाल पाॅझिटिव्ह अाले अाहेत. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी २१ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर केला असून नागरिकांनी त्याचे उल्लंघन करू नये. जीवनावश्यक वस्तू, अाैषधे, अन्नधान्य, भाजीपाला या गाेष्टी नागरिकांना मिळत राहतील. मात्र, त्यांनी कुठेही गर्दी करू नये. काेराेनाचे रुग्ण बरे हाेण्यासाठी रात्रंदिवस डाॅक्टर, नर्स प्रयत्नशील असून सर्वांनी स्वत:ला सुरक्षित ठेवावे.

X