आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 ते 3 दिवसांत चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडणार:नितीन गडकरींची माहिती, पुण्यातील रस्ते कामांची केली पाहणी

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​​पुढील 2 ते 3 दिवसांत पुण्याच्या चांदणी चौकातील उड्डाणपूल पाडण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. आज चांदणी चौकातील रस्त्याच्या कामाची पाहणी नितीन गडकरी यांनी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील चांदणी चौकातील रस्त्याच्या कामाची पाहणी केली होती.

अनेक रस्ते कामांचा शुभारंभ

नितीन गडकरी म्हणाले, पुणे शहर व आजूबाजूच्या परिसरात वाहतूक वाढत आहे. त्यामुळे इलिव्हेटेड दुमजली रस्ते बांधण्याबाबत काम सुरू आहे. पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 13 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. यासंर्दभात मंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे माजी महापौर, मनपा आयुक्त यांना चार ते पाच प्रस्ताव मी दिले आहे. पुणे-बगळुरू ग्रीन फिल्ड हायवेचे काम सुरु करण्यात आले आहे. पुणे-अहमदनगर रस्त्याचे कामही सुरू आहे. पुणे ते अहमदनगर दरम्यानचे आवश्यक भूसंपादन आम्ही करणार आहोत. सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर- चेन्नई-बँगलोर-हैद्राबाद-कोची असा नवीन महामार्ग केंद्राकडून बांधण्यात येत आहे.

दुष्काळी भागाचा विकास

गडकरी म्हणाले, उत्तर भारतातून दक्षिणेकडे जी वाहतूक होते, ती प्रथम सुरतला येऊन नंतर महाराष्ट्राकडे येते. हि वाहतूक मुंबई, पुण्याकडे न येता दुसऱ्या मार्गाने वळवून हवेचे प्रदूषण रोखण्यात येईल. मुंबई ते बंगळुरू अंतर साडेचार तासांत तर, पुणे ते बंगळुरू अंतर साडेतीन तासांत पूर्ण करण्याचे काम करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागातून हा मार्ग जाणार असून त्या भागाचा विकास याद्वारे होईल.

एलिव्हेटेड रस्ते बांधणार

गडकरी यांनी सांगितले, पुणे ते शिरुर आणि अहमदनगर ते औरंगाबादच्या जुन्या रस्त्यावर 3 मजली एलिव्हेटेड रस्ता बांधणीचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. तळेगाव दाभाडे ते शिरुर यादरम्यानही अशाचप्रकारे रस्ता तयार केल्यास मुंबईवरुन येणारी वाहतूक वळवता येईल. नाशिक फाटा ते खेड या रस्त्याच्या कामाची मी पाहणी करणार आहे.त्याठिकाणीही इलिव्हेटेड रस्ता पुढील ३० ते ४० वर्षांचा विचार करुन करण्यात येईल. महामार्गाच्या बाजूस लाॅजेस्टिक पार्क करिता आम्हाला मनपाने जागा दिल्यास दोन लाख कोटीचे लाॅजेस्टिक पार्क आम्ही बनवू. पुणे शहराजवळ चाकण एमआयडीसीलगत पावलेवाडी येथे १८० हेक्टर मल्टी स्टोरेज लाॅजेस्टिक पार्क तयार करण्याचे नियोजित आहे. रेल्वेद्वारे मालवाहतूकीचे ट्रक त्याठिकाणावरुन जातील. १६५ रोप-वे बस आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्याद्वारे बांधणार आहोत. पुण्यात डबल डेकर इलेक्ट्रिक बस सुरु करण्याचा विचार आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेकरिता केबल बस सुरु केल्यास आम्ही पैसे देऊ.

पालखी मार्गाचे काम गतीने

पालखी मार्गाचे काम गतीने सुरू असून डिसेंबरमध्ये चार व पाच मार्गिकेचे उदघाटन आम्ही करु. हा भक्तीमार्ग असून या मार्गावर झाडे लावण्यासाठी स्वयंसेवी संस्था पुढे येत आहे. शेक्षणिक संस्था, एनजीओ, नागरिकांनी याकामी पुढाकार घ्यावा. त्यातून संत संस्कृतीचे दर्शन घडू शकेल. पुणे ते सातारा दरम्यानच्या महामार्गाचा आम्ही पुन्हा डीपीआर तयार करत आहे. खंबाटकी घाटातील बोगद्याचे कामही गतीने करण्यात येत असून जूनमध्ये एक मार्ग सुरु करण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...