आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारणाचा भोंगा:भोंग्यांसाठी डेसिबलची मर्यादा पाळा, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा सल्ला, अजानच्या वेळीच हनुमान चालिसा न लावण्याचे आवाहन

पुणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजानचे भोंगे लावताना डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. ज्यांना हनुमान चालिसा लावायचा आहे त्यांनीही जरूर लावावा, पण त्याच वेळी लावू नये, असे सांगून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून धार्मिक वाद निर्माण करून समाजा-समाजात अंतर निर्माण करायचे, लहानमोठा विषय घेऊन रस्त्यावर येऊन आंदोलने करायची आणि राज्यात कायदा -सुव्यवस्था बिघडली म्हणून आरोप करण्याचे प्रकार सध्या सुरू आहेत, अशी खंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात बोलताना मशिदींवरील भोंगे उतरवा, अन्यथा दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा दिला होता. या मुद्द्यावर राज्यातील राजकारण तापले असतानाच गृहमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ डेसिबलची मर्यादा
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार रहिवासी क्षेत्रात दिवसा ५५ तर रात्री ४५ डेसिबलची मर्यादा घालून देण्यात आली आहे. त्याची जबाबदारी पोलिस दलावर आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शैक्षणिक संस्था, सर्व न्यायालये आणि रुग्णालयांचे १०० मीटर क्षेत्र शांतता परिसर घोषित आहे.

ध्वनिप्रदूषणाची नियमावली
विभाग दिवसा रात्री
आैद्याेगिक क्षेत्र ७५ ७०
कमर्शियल क्षेत्र ६५ ५५
रहिवासी क्षेत्र ५५ ४५
शांतता क्षेत्र ५० ४०

हनुमान चालिसा लावा, पण त्याच वेळी नको... “प्रत्येकाने आपल्या मर्यादा पाळल्या पाहिजेत. अजानचे भोंगे लावायचे आहेत त्यांनी डेसिबलची मर्यादा पाळली पाहिजे. ज्यांना हनुमान चालिसा लावायचा आहे, त्यांनीही जरूर लावावा. पण तिकडे होते त्याच वेळी लावू हे योग्य नाही. विरोधी पक्षाच्या लोकांनी कोर्टात जाणार असल्याचं सांगितलं आहे. आम्ही कोर्टाचा आदेश मान्य करू.” - दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

हनुमान चालिसा लावणाऱ्यांना मोफत भोंगे
हनुमान चालिसा लावणाऱ्यांना मोफत भोंगे देण्याचे मुंबईतील भाजप नेते मोहित कंबोज यांनी जाहीर केले आहे. मंदिरांवर हनुमान चालिसा लावण्यासाठी ज्यांना लावायचे आहेत त्यांना भोंगे आम्ही देऊ, असे कंबोज यांनी सोशल मीडियावर जाहीर केले. तसेच मशिदींवरील अनधिकृत लाऊडस्पीकर काढावेत, अशी मागणी कंबाेज यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...