आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात आता पोलिस कर्मचार्‍यांकडून पायी पेट्रोलिंग:सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांची सूचना

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील कायदा सुव्यवस्थेसह हद्दीतील छोट्या-मोठ्या घडामोंडीचा आढावा घेण्यासाठी आता प्रत्येक पोलिस ठाण्यातंर्गत चौकीतील कर्मचार्‍यांना पायी पेट्रोलिंग करावे लागणार आहे. विशेषतः चौकी हद्दीमधील धार्मिक स्थळे, संवेदनशिल ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, निमर्नुष्य ठिकाणांना भेटी देउन पाहणी करावी लागणार आहे.

त्याशिवाय काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाला कळवून मदत घेण्याची सूचना पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी केली आहे. त्यामुळे आता पायी पेट्रोलिंगसाठी कर्मचार्‍यांना अधिकचे कष्ट घ्यावे लागणार आहेत.

रात्री-अपरात्री होणार्‍या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर विविध घटनांवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी पायी पेट्रोलिंग गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित पोलीस ठाण्याच्या चौकीतील कर्मचार्‍यांकडून रस्त्याने पायी पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सर्व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी हद्दीत असलेल्या पोलीस चौक्यांमधील जास्तीत जास्त कर्मचार्‍यांना पायी पेट्रोलिंग करण्याचे सूचित केले आहे.

त्यांच्यावर संबंधीत पोलिस चौकी प्रभारी अधिकार्‍यांना नियंत्रण ठेवावे लागणार आहे. पोलिस कर्मचार्‍यांनी पेट्रोलिंग दरम्यान चौकी हद्दीमधील धार्मिक स्थळे, संवेदनशिल ठिकाणे, रहदारी रस्त्यांवर नजर ठेवावी लागणार आहे. त्याठिकाणी भेट दिल्यानंतर काही अनुचित प्रकार आढळल्यास तत्काळ नियंत्रण कक्षाला माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शहरभरात असलेल्या पोलिस चौकीतील कर्मचार्‍यांनी केलेल्या पायी पेट्रोलिंगचा अहवाल दररोज सर्व पोलिस ठाणे प्रमुखांना एकत्रित तयार करावा लागणार आहे. त्यानंतर अहवाल दर आठवड्याला संबंधित विभागाचे सहायक पोलीस आयुक्तांना सादर करावा लागणार आहे. त्यानुसार आठवड्यात संबंधित हद्दतील घटना, गुन्ह्यांचा धांडोळा घेतला जाणार आहे.

पायी पेट्रोलिंगचा अहवाल रोजचे रोज मागवून त्याबाबत कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून निर्णय ठाणे प्रमुखांना घ्यावे लागणार आहे. महिला सुरक्षितता, रात्री-अपरात्री कामावरून घरी जाणारे चाकरमानी, परगावाहून आलेले प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या पायी पेट्रोलिंगला महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे नागरिकांनाही फायदा होणार असून, सुरक्षिततेला बळकटी प्राप्त होणार आहे.

दुचाकीस्वार बीट मार्शलही राहणार कार्यरत

पोलिस चौक्यांतील जास्तीत जास्त कर्मचार्‍यांकडून पायी पेट्रोलिंग केले जाणार आहे. त्यासोबतच पोलिस ठाण्यातंर्गत दुचाकीस्वार बीट मार्शलांकडूनही पेट्रोलिंगवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे रात्रंदिवस पेट्रोलिंगला झळाळी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हद्दीत पायी पेट्रोलिंगची लवकरच सुरूवात केली जाणार असल्याची आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी कर्मचार्‍यांकडून पायी पेट्रोलिंगच्या घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांना चांगलाच फायदा होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...