आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बालवाडीच्या वयाच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांची वाणी, शब्दोच्चार सुस्पष्ट आणि निर्दोष असावेत या उद्देशाने पुण्यातील वेदपाठशाळेने ‘संस्कृतप्रधान बालवाडी’ या उपक्रमाची सुरुवात केली आहे. येथील वेदभवन या वेदपाठशाळेच्या वास्तूत ही संस्कृतप्रधान बालवाडी सुरू होत असून तीन ते पाच या वयोगटातील छोटे विद्यार्थी तिथे प्रवेश घेऊ शकतात.
पुण्यातील वेदमूर्ती मोरेश्वर घैसास यांच्या पुढाकाराने आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ईटीएचडीसी या संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांतून ही बालवाडी सुरू होत आहे. नुकताच या संस्कृतप्रधान बालवाडीच्या बोधचिन्हाचे अनावरण ज्येष्ठ संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते करण्यात आले. ही बालवाडी दोन वर्षे कालावधीची असेल. संस्कृतप्रधान बालवाडीचे वर्ग जून महिन्यापासून सुरू करण्याचा मानस आहे. मात्र, सध्या पुन्हा कोरोना संसर्गाचे संकट वाढल्याने थोडी अनिश्चितता निर्माण झाली आहे. पालकांकडून विचारणा सुरू झाली आहे. मात्र, योग्य ती काळजी आणि सुरक्षेचे सर्व नियम काटेकोर पाळूनच निर्णय घेतला जाईल, असे वेदमूर्ती घैसास गुरुजी यांनी सांगितले.
अभिनव संकल्पना : संस्कृतप्रधान बालवाडी ही अभिनव संकल्पना आहे. भाषांच्या अभ्यासासाठी सुरुवातीपासून श्रवणाचे संस्कार साहाय्यभूत ठरतील. आपल्या प्राचीन, ऐतिहासिक वारशाबद्दलची माहिती यातून लहान वयापासून मिळेल. मुलांचे उच्चार निर्दोष होतील. वाणी स्पष्ट होण्यास मदत मिळेल. पुढे यातूनच भाषांचे अभ्यासक, संशोधक घडतील, असे डॉ. भटकर म्हणाले.
पहिल्या वर्षी श्रवणसंस्कार, भाषेची तोंड ओळख
पहिल्या वर्षी फक्त श्रवण संस्कार आणि संस्कृत, हिंदी आणि इंग्रजी भाषांची तोंडओळख असा अभ्यासक्रम असेल. दुसऱ्या वर्षी तिन्ही भाषांच्या श्रवणाबरोबर पाठांतर, योग्य उच्चारणावर भर दिला जाईल. दोन्ही वर्गात मिळून ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. यामुळे बालवयापासून मुलांच्या वाणीवर योग्य उच्चारांचे संस्कार होतील. त्यातून आकलनाला मदत मिळेल. भाषांविषयीचे प्रेम निर्माण होण्यास मदत मिळेल. भविष्यात यातील काही विद्यार्थी भाषांच्या सखोल अभ्यास आणि संशोधनाकडे वळतील हा उद्देश आहे, असे वेदमूर्ती घैसास गुरुजी म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.