आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुरावलेल्या बछड्यांना आईजवळ पोचवणारी 100 वी पुनर्भेट:वनविभाग- वाईल्डलाईफ एसओएस यांचा संयुक्त उपक्रम

जयश्री बोकील । पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणूस आणि वन्यप्राणी संघर्ष हा विषय गेल्या काही वर्षांपासून चर्चेचा ठरत आहे. विकासाचे नाव देत, राखीव वनसंपदेचाही विनाश करत चाललेल्या मानवी हस्तक्षेपामुळे वन्यप्राण्यांचे मानवी वस्तीत येणे, सातत्याने घडू लागले आहे. पुण्याजवळचा जुन्नर परिसर असाच माणूस आणि वन्यप्राणी संघर्षामुळे सर्वत्र गाजतो आहे.

त्याच परिसरात वनविभाग आणि वाईल्डलाईफ एसओएस या स्वयंसेवी संघटनेच्या संयुक्त प्रयत्नांतून आईपासून दुरावलेल्या बछड्यांची आईसोबतच पुनर्भेट शताब्दी गाठणारी ठरली आहे. वनविभाग आणि वाईल्डलाईफ एसओएस, यांनी 45 दिवसांच्या बिबट्याच्या बछड्याची आईसोबत पुनर्भेट घडवली आणि शंभरी साजरी केली.जुन्नर तालुक्यातील शिरोली गावातील उसाच्या दाट पिकात शेतकऱ्यांना आईपासून भरकटलेले बिबट्याचे पिल्लू आढळले. शेतकऱ्यांनी त्वरित वनविभागाला याची माहिती दिली.

वनविभागाचे आणि स्वयंसेवी संघटनेचे रेस्क्यू पथक लगेच घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बिबट्याचे पिल्लू ताब्यात घेऊन, माणिकडोह येथील ‘बिबटे निवारा केंद्रात पिल्लू वैद्यकीय तपासणीसाठी आणले. केंद्रातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी पिल्लाची तपासणी केली. पिल्लू नर असून, त्याचे वय अवघे 45 दिवस असावे, असा निष्कर्ष काढला. बिबट्याचा हा बछडा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याने बछड्याला त्याच्या आईला भेटवण्याचा प्रयत्न करण्याचा निर्णय घेण्यात आला. बछडा जिथे सापडला होता, तिथेच त्याला एका खोक्यामध्ये सुरक्षित ठेवण्यात आले.

आईला त्याचा ठावठिकाणा लवकर समजावा म्हणून आजूबाजूला तसेच खोक्यावर बछड्याच्या मूत्राचे थेंब टाकण्यात आले. कॅमेरा ट्रॅप सज्ज करण्यात आला. अपेक्षेनुसार रात्री उशिरा पिल्लाचा आवाज ऐकून आणि वासामुळे मादी बिबट खोक्यापाशी आली आणि बछड्याला खोक्यातून उचलून, तोंडात पकडून सुरक्षित ठिकाणी घेऊन गेली.

हे सर्व दृष्य कॅमेऱ्यात चित्रित झाले असून, वनविभाग आणि वाईल्डलाईफ एसओएस, यांनी घडवलेली ही शंभरावी पुनर्भेट ठरली, अशी माहिती संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक सत्यनारायण यांनी दिली. वनविभाग आणि संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांतून ही शंभरावी पुनर्भेट शक्य झाली.

2009 पासून आम्ही हे कार्य करत आहोत. वन्यप्राण्यांना वाचवणे, उपचार करणे, बछड्यांना आईला भेटवणे, असा क्रम सुरू आहे. सुदैवाने या परिसरातील नागरीकांचे प्रबोधन करण्यात यश मिळाल्याने पुनर्भेटी यशस्वी होत आहेत.

वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन सावने म्हणाले,‘बछडा नर होता. त्याचे वय 45 दिवसांचे असावे. तो तंदुरुस्त होता. त्यामुळे लगेच पुनर्भेट घडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. बछड्याचे मूत्र शिंपडल्याने मादी बिबट वासावरून त्वरित पिलू शोधत येणार, याची खात्री होती. तसेच घडले. त्यामुळे दुरावलेला बछडा पुन्हा आईजवळ जाऊ शकला.

बातम्या आणखी आहेत...