आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गवगव्याने घेतला गव्याचा बळी:गव्याला पकडण्यासाठी वन विभागाची दमछाक; मात्र दुर्दैवाने गव्याचा मृत्यू

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
गव्याला पकडण्यासाठीचे वन विभागाचे प्रयत्न अखेर 5 तासांनंतर यशस्वी झाले. - Divya Marathi
गव्याला पकडण्यासाठीचे वन विभागाचे प्रयत्न अखेर 5 तासांनंतर यशस्वी झाले.
  • पुण्यात पाच तास रानगव्याचा मनसोक्त वावर
  • गव्याच्या धडकेत काही वाहनांचे नुकसान

कोथरूडसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरात बुधवारी सकाळी अचानक रानगव्याने दर्शन दिल्याने खळबळ माजली. जवळपास पाच तासांच्या प्रयत्नांनंतर वन विभागाने गव्याला जेरबंद करण्यात यश मिळवले. पण नागरी वस्तीत शिरल्याने बिथरलेल्या, घाबरलेल्या आणि लोकांच्या पाठलागामुळे दमलेल्या गव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शहरी भागात आलेल्या जंगलातील प्राण्यास माणसांच्या विचित्र स्वभावाचा सामना करावा लागला आणि त्यास जिवास मुकावे लागले, अशी चर्चा आता रंगली आहे.

बुधवारी सकाळी सहाच्या आसपास कोथरूड परिसरातील महात्मा सोसायटीच्या गल्ली क्रमांक एकपाशी फिरायला आलेल्या मंडळींना हा प्राणी दिसला. सुरुवातीला गाय किंवा म्हैस असावी, अशा समजुतीत असलेल्या नागरिकांची या प्राण्याचा डुरकण्याचा आवाज ऐकताच घाबरगुंडी उडाली. हा प्राणी गाय, म्हैस नसून रानगवा आहे, हे लक्षात येताच पळापळ सुरू झाली. काही नागरिकांनी त्वरित पोलिस, मनपा आणि वन विभाग तसेच अग्निशमन दलाच्या यंत्रणेशी संपर्क साधला. त्यानंतर हालचाल सुरू होऊन प्रत्यक्ष रेस्क्यू टीम्स दाखल होईपर्यंत अकरा वाजून गेले होते. महात्मा सोसायटीपासून तो जवळपास सहा किलोमीटर अंतर धावला होता. तशात भुलीचे इंजेक्शन दिल्यावर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर त्याला जाळ्यात गुंडाळून गाडीत ठेवण्यात आले. मात्र झालेले श्रम, जखमा, धाप आणि भुलीचे इंजेक्शन यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच गव्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे वन विभाग अधिकारी राहुल पाटील यांनी सांगितले. सकाळी सहापासून गव्याला पकडण्यासाठी सुरू असलेले वन विभागाचे प्रयत्न पाच तासांनंतर यशस्वी झाले. पण गव्याचा दुर्दैवी मृत्यू ते रोखू शकले नाहीत, याची हळहळ व्यक्त केली जात आहे.

गव्याच्या धडकेत काही वाहनांचे नुकसान

बघ्यांची गर्दी, पाठलाग करणारे लोक आणि मोबाइलमध्ये सारे शूट करण्यासाठी धावणारी मंडळी यामुळे गवा बिथरला आणि महात्मा सोसायटी परिसराच्या संरक्षक भिंतीवरून उडी घेऊन अचानक इंदिरा शंकर सोसायटी, भुसारी काॅलनी, गादिया इस्टेट, भारतीनगर सोसायटी असा सुसाट धावला. त्याच्या पाठोपाठ बघ्यांची गर्दी धावत होती. वाटेत धावताना गव्याची धडक बसून काही वाहनांचे नुकसान झाले. गवाही जखमी झाला. त्याच्या तोंडातून रक्त येत होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser