आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यात फाईव्ह स्टार हॉटेलच्या नावाने गंडा:मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने पावणेतीन लाखांची फसवणूक, येरवडा ठाण्यात गुन्हा दाखल

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंचतारांकित हाॅटेलचे आर्कषण सर्वांनाच असते आपणही सातत्याने अशा हाॅटेलमध्ये जावे अशी सुप्त इच्छा अनेकजण बाळगतात. मात्र, याच पंचतारांकित हाॅटेलच्या आकर्षक ऑफरमध्ये मेंबरशीप घेण्याच्या नादात पुण्यातील एका व्यवसायिकाला तब्बल पावणेतीन लाख रुपयांचा गंडा भामटयांनी घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी एकूण आठ आराेपींवर येरवडा पाेलिस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रितेशकुमार अशाेककुमार बजाज (वय-46, रा.खराडी,पुणे) यांनी पाेलिसांकडे आराेपीं विराेधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार काेर्टीयार्ड हाॅलीडेज वर्ल्ड प्रा. लि. कंपनीचे अशिष कुमार अराेरा, साहीब अलम, दीपक काैशल, प्रभांशू गाैर, अकशित कक्कर, रेहान मलीक, गजेंद्र सिंग, वंश ठाकुर या आराेपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 1 ऑक्टोबर 2021 ते 30 ऑक्टोबर दरम्यान घडला.

100 रात्री निम्म्या किमतीत

दिल्लीतील काेर्टीयार्ड हाॅलीडेज वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे रेहान मलीक यांनी सुरुवातीला तक्रारदार रितेशकुमार बजाज यांना फाेन करून पंचतारांकित मेरियट हाॅटेलच्या मेंबरशीपसाठी आकर्षक ऑफर असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना पुण्यातील अहमदनगर रस्त्यावरील हयात या पंचतारांकित हाॅटेल मध्ये भेटण्यासाठी आराेपींनी बाेलवून घेतले. त्याठिकाणी बजाज हे पत्नीसह गेले असताना, त्यांना आराेपी गजेंद्र सिंग, वंश ठाकूर हे दाेघे जण भेटले. त्यांना फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये 100 रात्री निम्म्या किंमतीत मिळतील असे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला.

शिवीगाळ करून धमकावले

त्यांच्याकडून क्रेडिट कार्ड पाहण्याकरिता घेऊन आराेपींनी त्यांना बाेलण्यात गुंतवून ठेवत परस्पर त्यांच्या संमती शिवाय मशिनवर क्रेडीट कार्ड स्वाईप करुन दाेन लाख 77 हजार रुपये काढून घेत फसवणुक केली. तसेच इतर आराेपी यांनी तक्रारदार यांना 15 दिवसात तुमचे पैसे परत करू असा बहाणा करून त्यांना शिवीगाळ करुन धमकावले आणि आतापर्यंत पैसे परत केले नाही.

न्यायालयाकडे दाद

दरम्यान, याप्रकरणाची पाेलिसांनी तातडीने तक्रार न घेतल्याने रितेशकुमार बजाज यांनी न्यायालयाकडे दाद मागितली. न्यायालयाने सीआरपीसी 156 (3) प्रमाणे पाेलिसांना गुन्हा दाखल करून तपास करण्याचे आदेश दिले आहे. येरवडा पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक एस. आळेकर याबाबत पुढील तपास करत आहे.

बातम्या आणखी आहेत...