आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंडा:रांका ज्वेलर्सची एक कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक; पुण्यात बनावट सह्या करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे शहरातील रांका ज्वेलर्स मध्ये काम करत असलेल्या लेखापालांकडून एक कोटी सहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दोन लेखापालांनी बनावट सह्या करुन अनोळखी व्यक्तीच्या नावावर चेक काढून एक कोटी सहा लाख 35 हजार 725 रुपयांची फसवणूक केली असल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे.

याबाबत लेखापाल अमन ओझा, देव नारायण दुबे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रांका ज्वेलर्स सराफी पेढीच्या रविवार पेठ शाखेतील व्यवस्थापक राजू दिगंबर देशपांडे यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रविवार पेठेतील रांका ज्वेलर्सच्या शाखेत दहा सप्टेंबर 2020 ते सात फेब्रुवारी 2023 या कालावधीत हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू देशपांडे रांका ज्वेलर्समध्ये व्यवस्थापक म्हणून काम करत आहेत.

अमन ओझा आणि देव नारायण दुबे सराफी पेढीत लेखापाल पदावर कार्यरत आहेत. दोघांनी सराफी पेढीचे खाते असलेल्या बँकेच्या धनादेशावर देशपांडे यांच्या नावाने बनावट सह्या केल्या. त्यानंतर अनोळखी व्यक्तींच्या नावावर त्यांनी बिल तयार केले. त्यानंतर धनादेश अनोळखी व्यक्तीच्या खात्यावर जमा करुन ओझा आणि दुबे यांनी पैसे काढून घेतले.

दोघांनी वेळोवेळी एक कोटी सहा लाख 35 हजार 725 रुपये परस्पर काढले. दरम्यान, ओझा आणि दुबे यांनी महिनाभराच्या अंतराने अचानक नोकरी सोडून दिली. त्यामुळे देशपांडे यांना शंका आली. त्यांनी धनादेशाची पाहणी केली. तेव्हा धनादेशावर देशपांडे यांची बनावट सही असल्याचे आढळून आले. त्यानंतर देशपांडे यांनी गेल्या दोन वर्षातील सर्व हिशोब तपासला. त्यावेळी दोघांनी देशपांडे यांची बनावट सही करुन फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर देशपांडे यांनी गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. तक्रार अर्जाची चौकशी करुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पुढील तपास गुन्हे शाखेचे युनिटे एकचे पथक करत आहे.