आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखर परिषदेचे उद्घाटन:राज्यातील प्रश्नांसाठी केंद्रात खंबीरपणे उभी असणारी व्यक्ती म्हणजे गडकरी: शरद पवार

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कुठलाही प्रश्न किंवा समस्या उद्भवल्यास, राज्याच्या बाजूने खंबीरपणे उभी असणारी केंद्रातली व्यक्ती म्हणजे नितीन गडकरी. आज या कार्यक्रमात गडकरी आपल्यासोबत आहेत, याचा मनापासून आनंद वाटतो, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी नितीन गडकरी यांचे जाहीर कौतुक केले. राज्याच्या प्रश्नासाठी पक्षातीत पाठिंबा देणारे गडकरी आहेत, असेही ते म्हणाले.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय साखर परिषदेचा उद्घाटन सोहळा पवार व गडकरी यांच्या सुदीर्घ भाषणांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरला. पवार आणि गडकरी यांनी आपापल्या भाषणांतून साखर कारखानदारी, ऊस उत्पादक, शेतकरी, तोडणी कामगारांपासून ते निर्यातीपर्यंत सर्व पैलू मांडले. योग्य ती पार्श्वभूमी, आवश्यक आकडेवारी, भविष्याचा वेध असा त्रिविध विचार या दोन अनुभवी नेत्यांच्या बोलण्यातून पुढे आला.

पवार म्हणाले, ‘सध्या राज्य सरकारमध्ये साखर
कारखानदारीची जाण असणारे अनेक सहकारी आहेत. केंद्रात गडकरी आहेत, जे सदैव राज्यासाठी खंबीरपणे उभे राहतात. आपण साखर उद्योगात आता अग्रस्थान मिळवले आहे, हे सामूहीक श्रेय आहे. हवामानाने साथ दिल्याने हंगाम उत्तम होता. उत्पादन विक्रमी झाले आणि निर्यातही सर्वोच्च झाली. यंदाही अनुकूल हवामानाचा अंदाज आहे. त्यामुळे उत्पादन आणि ऊसक्षेत्र वाढणार, असे दिसत आहे. आपली साखर जगातल्या १२१ देशांत पोचली आहे. हे प्रथमच घडले आहे. आता विदर्भातील ऊसक्षेत्र वाढवले पाहिजे. गडकरी यांनी सांगितल्याप्रमाणे विदर्भात व्हीएसआयची शाखा सुरू करू. जमीन आम्ही घेऊ आणि पैसे व्हीएसआय देईल, अशी मिष्किल टिपण्णी पवार यांनी केली. देशातील १८८ लोकसभा मतदारसंघात ऊस उत्पादक महत्त्वाची भूमिका बजावत असतात, असा संदर्भ गडगरी यांनी दिला. तसेच पुणे औरंगाबाद आणि पुणे बंगळूर ग्रीनफिल्ड रस्त्याच्या संदर्भात अजीत पवार यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती ट्विटरवरून दिली.

गाडीत साखर किती?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन सहभागी होते. ते म्हणाले, ‘मी शहरी माणूस, त्यामुळे साखरेचा आणि माझा संबंध चहात साखर किती, एवढाच...पण साखरेपासून इथेनाॅल निर्मिती झाल्यावर गाडीत साखर किती, असा प्रश्नही शहरी बाबू विचारतील. साखरेविषयीचा मुद्दा आला की मी उजवी-डावीकडे पाहतो...अजित पवार आणि बाळासाहेब थोरात असतात, ते मार्गदर्शन करतात.’

बातम्या आणखी आहेत...