आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासामाजिक सुरक्षा विभागाने सुरु केलेल्या धाडसत्रामुळे आता जुगार अड्डे चालविणारे अधिक जागरुक झाले असून त्यांनी रिक्षा आणि दुचाकीचा आधार घेऊन त्याद्वारे मटका, जुगार अड्डा सुरु ठेवला आहे. पर्वती दर्शन येथील एका जुगार अड्डयावर छापा टाकताना सामाजिक सुरक्षा विभागाने ज्या दुचाकीवर मटक्याचे आकडे घेत होता, ती दुचाकीच जप्त केली आहे. जुगार, मटक्यावरील धाडीत प्रथमच अशा प्रकारे वाहन जप्त केले गेले आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपयुक्त श्रीनिवास घाडगे यांनी मंगळवारी दिली आहे.
दुकानाबाहेर दुचाकीवर मटका
दुकानात तसेच दुकानाबाहेर फुटपाथवर बाईकवर खुलेआम सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून तब्बल 16 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 2 लाख 22 हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाने शहरात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाडसत्र सुरु केले आहे.लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळीच्या पारस चेंबर्स इमारतीच्या तळमजल्यावरील कोपर्यातील गाळ्यात श्री स्वामी समर्थ लॉटरी सेंटर या दुकानात व दुकानाबाहेर जुगार सुुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक यांना मिळाली. त्यांच्या पथकाने तेथे सोमवारी सायंकाळी छापा टाकला. तेथे कल्याण मटका, सोरट, पंकी पाकोळी, व्हिडिओ गेमवरील जुगार, गुडगुडी जुगार वैगेरे प्रकारचे जुगार खेळणारे 8, खेळविणारे 4 आणि अड्डा मालक 4 अशा 16 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
या आरोपींकडून 68 हजार 958 रुपये रोख, 39 हजार 500 रुपयांचे 12 मोबाईल, 1 लाख 13 हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य व दुचाकी असा एकूण 2 लाख 22 हजार 358 रुपयांचा माल जप्त केला आहे. सोमवारी केलेल्या कारवाईत ज्या दुचाकीवरुन मोबाईल मटका खेळला जात होता, ती दुचाकीसुद्धा जप्त करण्यात आली आहे.ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक, पोलिस निरीक्षक श्रीधर खडके, हवालदार कर्पे, कुमावत, महिला हवालदार शिंदे, पोलिस नाईक केकाण, कांबळे, कोळगे यांच्या पथकाने केली आहे.
मोबाईल जुगार तेजीत
गेल्या काही दिवसांपासून सामाजिक सुरक्षा विभागाकडून जुगार धाडसुत्र सुरु आहे. त्यामुळे जुगार चालकांनी नविन शक्कल लढवून मोबाईल जुगार सुरु केला आहे. यात जुगार रायटर हा एखाद्या रिक्षात अथवा दुचाकीवर बसून खेळीकडून मटका व रक्कम स्वीकारतो़ पोलीस कारवाईची थोडी जरी खबर लागल्यास त्याच गाडीतून तो पसार होतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.