आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ महिलेची 22 लाखांची फसवणूक:सदनिका विक्रीच्या नावाखाली गंडा; न्यायालयाने फेटाळला बिल्डरचा जामीन अर्ज

पुणे25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सदनिका विक्रीच्या नावाखाली ज्येष्ठ महिलेची 22 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम विकासकाचा जामीन अर्ज वडगाव मावळ न्यायालयाने गुरवारी फेटाळला. सत्र न्यायाधीश व्ही. डी. निंबाळकर यांनी हा आदेश दिला.

सूर्यकांत शांताराम चव्हाण (वय 67, रा. तळेगाव दाभाडे,पुणे) असे जामीन फेटाळलेल्या विकासकाचे नाव आहे. त्यांच्याविरोधात शुचिता बाबुराव चव्हाण (वय 78, रा. नाशिक) यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 14 जून 2016 ते 26 एप्रिल 2022 या कालावधीत तळेगाव दाभाडे परिसरातील इंद्रपुरी सोसायटीतील वल्लरी अपार्टमेंट येथे फसवणुकीचा प्रकार घडला.

संशयित आरोपीने या अपार्टमेंटमधील स्वतःच्या नावे असलेली सदनिका फिर्यादींना विकत देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्याकडून 22 लाख रुपये स्वतःच्या बँक खात्यावर घेऊन ईसार पावतीही केली. मात्र, ती सदनिका परस्पर अन्य व्यक्तीला विकून फिर्यादींची फसवणूक केली, असे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या संशयित सूर्यकांत चव्हाण यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. त्याला अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी विरोध केला. आरोपीने हेतूपूर्वक फिर्यादींच्या वयाचा आणि एकाकीपणाचा फायदा घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. आरोपीला जामीन झाल्यास तो देशाबाहेर परागंदा होण्याची, तसेच फिर्यादी व साक्षीदारावर दबाव आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे तपासावर परिणाम होऊन, वयोवृद्ध फिर्यादी महिलेला न्याय मिळणार नाही, असा युक्तिवाद अतिरिक्त सरकारी वकील पाठक यांनी केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने चव्हाण यांचा जामीन अर्ज फेटाळला.

बातम्या आणखी आहेत...