आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तराखंड दुर्घटना:दरडी कोसळण्याच्या पूर्वसूचनेसारखी हिमकडे कोसळण्याची पूर्वसूचना शक्य : भूगर्भतज्ञ अरुण बापट

पुणे / जयश्री बोकील6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंड राज्यातील हिमकडा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. मात्र अशा प्रकारच्या दुर्घटनेची पूर्वसूचना मिळवणे शक्य होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ भूगर्भतज्ञ अरुण बापट यांनी केले. जी यंत्रणा लॅडस्लाइडच्या पूर्वसूचनेसाठी सिक्कीम येथे वापरली जाते, तशाच प्रकारची यंत्रणा स्नोस्लाइडच्या घटनेतही वापरता येईल, असे बापट यांनी सांगितले.

बापट म्हणाले, काही वर्षांपूर्वी केदारनाथ येथे ढगफुटीमुळे दुर्घटना झाली होती. आता उत्तराखंड राज्यातील चमोली जिल्ह्यातील जोशी मठाजवळच्या गावात रविवारी हिमकडा कोसळला. त्यामुळे नजिकच्या हायड्रोपाॅवर युनिटचे मोठे नुकसान झाले. अलकनंदा आणि धवलगंगा नद्यांची पाणीपातळी अचानक वाढून पूर आले आणि जीवितहानी झाल्याचेही वृत्त आहे. यासंदर्भात केरळमधील अमृता विश्वविद्यालयमतर्फे विकसित करण्यात आलेली लॅडस्लाइड पूर्वसूचना यंत्रणा स्नोस्लाइडच्यासंदर्भात योजता येऊ शकते, असे सुचवावेसे वाटते. अर्थात लॅडस्लाइडसंदर्भातील यंत्रणा स्नोस्लाइडच्या घटनेतही जशीच्या तशी उपयुक्त ठरेल का, याचा अभ्यास आणि संशोधन आधी करावे लागेल.

सिक्कीमला जाण्यासाठी बागडोगरा हा एकमेव रस्ता आहे. या ११० किमी अंतराच्या रस्त्यावर नेहमी डोंगरकडे कोसळून नुकसान तर व्हायचेच, पण एकमेव रस्ता बंद होऊन पूर्ण संपर्क तुटायचा. यासाठी गंगटोक विद्यापीठ आणि अमृता विश्वविद्यालयमतर्फे लॅडस्लाइड पूर्वसूचना यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. योग्य सर्वेक्षण आणि संशोधनानंतर लॅडस्लाइडच्या शक्यता असणारी तीन ठिकाणे निश्चित करून, तिथे १५ मीटर खोल छिद्रे पाडण्यात आली. त्यातून सेन्सर्स पाठवण्यात आले. लॅडस्लाइडच्या आधी किमान २४ तास भूगर्भात विशिष्ट हालचाली सुरू होतात. त्या हालचाली छिद्रातून सोडलेले सेन्सर्स टिपतात आणि गंगटोकमधील कंट्रोल रूममध्ये ही माहिती त्वरित मिळते. सर्व यंत्रणा सौरऊर्जेवर चालते.भूगर्भातील हालचालींची माहिती मिळाली की, संभाव्य लॅडस्लाइडचे स्थान नेमके शोधता येते आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग त्वरित कार्यरत होऊन नुकसान टाळता येते. ही यंत्रणा स्नोस्लाइडच्या संदर्भात लागू करता येईल.याशिवाय भूगर्भात होणारे तापमानातील बदल सॅटेलाईटवरही नोंदवले जातात.

बातम्या आणखी आहेत...