आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथून “पुणे शिवाजीनगर-तळेगाव-लोणावळा लोकल सेवा” सोमवारी सुरू करण्यात आली. या सेवेचे खासदार गिरीश बापट यांनी ऑनलाईन उपस्थित राहून उद्घाटन केले. या प्रसंगी आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार सुनील कांबळे, गौरव बापट व इतर पदाधिकारी तसेच रेल्वेचे अधिकारी शिवाजीनगर रेल्वे स्थानक येथे उपस्थित होते.
यावेळी बोलताना बापट यांनी सांगितले की, पुणे शहरासह उपनगरेही झपाट्याने विकसित होत असून नागरिकांना रेल्वेने प्रवास करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले केवळ पुणे रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे सध्या या स्टेशनवर प्रचंड ताण येत असल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी, रेल्वे व पोलीस प्रशासनावर ताण, तसेच नागरिकांना वेळेवर इच्छितस्थळी पोहचण्यास विलंब आणि आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो.
भविष्यातही पुणे स्टेशनवरील हा ताण असाच वाढत रहाणार असल्याने पुणे रेल्वे स्टेशनला शहरातच पर्यायी व्यवस्था म्हणून शहरातील खडकी, शिवाजीनगर, हडपसर ही रेल्वे स्थानके विकसित करून या स्थानकावरून नवीन पर्यायी रेल्वे सेवा सुरु कराव्यात अशी माझी सातत्याने आग्रहाची मागणी होती. यासंदर्भात मी संसदेतही अनेक वेळा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे शिवाजीनगर रेल्वे फलाटाचे रुंदीकरण व नवीन लोकल रेल्वे सेवेचे उद्घाटन करताना मला विशेष आनंद होत आहे.
शिवाजीनगर स्टेशन वरून तळेगाव-लोणावळा लोकल सेवा सुरु करण्यात आली असून येत्या काही दिवसात अजून 4 नवीन रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहेत. तसेच स्टेशनवर प्रवाशांच्या सुविधेसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, प्लॅटफॉर्म निवारा, टॉयलेट ब्लॉक, लाइटिंग, पंखे, एफओबी, वॉटर कुलर, घड्याळ, डस्टबिन, पीएएस, ट्रेन इंडिकेटर बोर्ड व इतर सुविधेसह प्लॅटफॉर्मच्या विस्ताराचे काम करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.