आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रत्येक दुःखी व्यक्तीला मानसिक आधार देण्याचे काम ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून करावे. या शास्त्राशी निष्ठा ठेवावी. दैनंदिन जीवनात त्रस्त झालेल्या व्यक्तींना योग्य दिशा दाखवावी. ज्योतिष अधिवेशन हा ज्ञान सोहळा आहे. त्यातून सर्वांनी ज्ञानप्राप्ती करावी. ज्योतिषशास्त्राच्या विद्यार्थ्यानी एकाग्रता ठेवावी. तरच हे शास्त्र यशाकडे नेईल, असे आवाहन अतुलशास्त्री भगरे यांनी व्यक्त केले. श्री ज्योतिष संशोधन केंद्र (जळगाव) तर्फे आयोजित दोन दिवसीय अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशनाचे उद्घाटन टिळक स्मारक मंदिर येथे बुधवारी पं. अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला ज्योतिषरत्न नंदकिशोर जकातदार, चंद्रकांत शेवाळे, गौरी केंजळे, प्राचार्य रमणलाल शहा (सातारा ), रवींद्र जोशी (जळगाव ), ज्योतिर्विद सुनील पुरोहित, नरेंद्र सहस्त्रबुद्धे, हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे, महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष अनिल चांदवडकर, परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. ज्योती जोशी यांच्या हिंदी भाषेतील अनुवादित ज्योतिष विषयावरील तीन पुस्तकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.अधिवेशनाचे हे दुसरे वर्ष असून, मागील वर्षी अधिवेशन ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आले होते. अधिवेशनाला संपूर्ण महाराष्ट्रातून ज्योतिषप्रेमी व मान्यवर उपस्थित होते.
नंदकिशोर जकातदार म्हणाले, ज्योतिषांना कमीतकमी वेळात भविष्य विषयक प्रश्नांची उत्तरे देता आली पाहिजेत. शास्त्र म्हणून ज्योतिष विकसित झाले पाहिजे. वास्तूशांती ऐवजी वास्तूपूजा हा शब्द वापरला पाहिजे. साडेसाती, कुंडलीतील मंगळाचा विचार, नारायण नागबळी, वास्तू दोष हे शब्द काढून टाकले पाहिजेत. ज्योतिषशास्त्र हे सल्ला शास्त्र आहे, आपण सल्ला सेवा देऊन फी घेत असतो. त्यामुळे ज्योतिषांनी शॉप अँक्ट लायसन्स काढावे.
चंद्रकांत शेवाळे म्हणाले, प्रत्येक ज्योतिष पध्दती आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. ज्योतिष पाहण्याच्या शंभरहून अधिक पध्दती विकसित झाल्या आहेत. ज्योतिष अभ्यासकांनी दीर्घ अभ्यास करून त्याचा लाभ करून द्यावा. एकाच पद्धतीने भविष्य सांगावे, दुसऱ्या पध्दतीने पडताळा घेण्याचा प्रयत्न करू नये.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.