आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा हक्क दिला आहे. मात्र, देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाही आम्ही सामाजिक दृष्ट्या पारतंत्र्यात आहोत. परिणामी सामाजिक संघर्षाला सामोरे जावे लागत आहे. मअशी भूमिका तृतीयपंथी कार्यकर्त्या सोनाली दळवी यांनी मांडली.
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 76 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित 18 व्या सेवा कर्तव्य त्याग सप्ताहात 'चला जाणूया एलजीबीटीक्यूला, करूया सन्मान त्यांचा' या विशेष कार्यक्रमात दळवी बोलत होत्या. एलजीबीटीक्यूचे प्रतिनिधी सोनाली दळवी, झोया शिरोळे, विजया वसवे, अनिल उकरंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी सप्ताहाचे संयोजक माजी आमदार मोहन जोशी, लोकायतच्या अलका जोशी, कार्यक्रमाच्या समन्वयिका प्राची दुधाने, स्वाती शिंदे आदी उपस्थित होते.
दळवी म्हणाल्या, आजही उपजिवीकेसाठी आम्हाला झगडावे लागते. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागतो. उपजिकेसाठी तृतीयपंथींना सिग्नलवर पैसे मागावे लागतात. तृतीयपंथी त्यांच्या अधिकारापासून वंचित आहेत, ही खेद जनक बाब आहे. समलिंगी विवाहाला पाठिंबा देऊन काँग्रेस पक्षाने आमचा पहिला सन्मान केला आहे.
झोया शिरोळे, विजया वसवे, अनिल उकरंडे यांनी त्यांना करावा लागणारा संघर्ष मनोगतातून व्यक्त केला. 'एलजीबीटीक्यू' व्यक्तींना शिक्षण, रोजगाराच्या समान संधी मिळाव्यात. समाजाने तिरस्काराने पाहण्यापेक्षा आम्हीही त्यांच्यातीलच आहोत, हे समजून घ्यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मोहन जोशी म्हणाले, काँग्रेस पक्ष सातत्याने सामाजातील प्रत्येक घटकाचा सन्मान करणारा पक्ष आहे. स्री-पुरुष या भेदापलिकडे जाऊन एलजीबीटीक्यु घटकाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा. त्यांना समाजात चांगली वागणूक मिळावी. तृतीयपंथीयांना काँग्रेसने संघटनेच्या कामातही सहभागी करून घेतले आहे. ही बदलाची सुरुवात आहे. यापुढे ही त्यांचा वेळोवेळी सन्मान करत त्यांना योग्य संधी देण्यात येईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.