आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक एप्रिलपासून ई ऑफीस प्रणाली सुरू करणार असल्याची घोषणा नुकतीच केली. त्यामध्ये पेपरलेस व्यवहार करण्यावर भर असेल. त्या दिशेने महावितरणने बिलांच्या बाबतीत यापूर्वीच काम सुरू केले आहे. गो ग्रीन योजनेचा लाभ घेऊन वीज ग्राहकांनी पर्यावरण वाचविण्यास मदत करावी आणि प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत मिळवावी, असे आवाहन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले. गो ग्रीन योजनेचा आतापर्यंत तीन लाख 56 हजार ग्राहकांनी लाभ घेतला आहे.
सिंघल म्हणाले की, महावितरणच्या गो ग्रीन योजनेत ग्राहकांनी छापील कागदी बिलाच्या ऐवजी ईमेलने येणाऱ्या पेपरलेस बिलाचा पर्याय स्वीकारला तर त्यांना कागदी बिल पाठविणे बंद केले जाते व प्रत्येक बिलात दहा रुपये सवलत देण्यात येते. ई ऑफीस प्रणालीमध्ये प्रत्यक्ष कागदाचा वापर न करता माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पेपरलेस कामावर भर आहे. वीज ग्राहकांनी गो ग्रीनच्या सवलतीचा लाभ घेतला तर छापील बिले कमी होऊन कागदाचा वापर कमी होईल व पेपरलेस कामाला चालना मिळेल तसेच पर्यावरणाचे रक्षण होईल.
महावितरणच्या वेबसाईटवर जाऊन ग्राहक क्रमांक आणि बिलिंग युनिट ही माहिती भरून नोंदणी करता येते. महावितरणच्या मोबाईल ॲपवरूनही नोंदणी करता येते. नोंदणी करणाऱ्या ग्राहकाला ओटीपी क्रमांक पाठविण्यात येतो. त्यामुळे नेमक्या संबंधित ग्राहकाकडूनच नोंदणी होत असल्याची खात्री होते. त्यानंतर ग्राहकाला त्याने दिलेल्या ईमेल आयडीवर एक लिंक पाठविली जाते. लिंकवर क्लिक करून पडताळणी केली की प्रक्रिया पूर्ण होते. पुढच्या बिलापासून ग्राहकाला त्याची बिले ईमेलने पाठविली जातात व कागदी छापील बिले बंद केली जातात. ग्राहकाला हवे तेव्हा त्याला ईमेलने आलेल्या बिलाचा प्रिंट घेता येतो.
गो ग्रीन योजनेचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांमध्ये पुणे परिमंडळ आघाडीवर आहे. या परिमंडळात 89,936 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्या पाठोपाठ कल्याण (40,144), भांडूप (34,917), नाशिक (33,141) आणि बारामती (26,398) यांचा क्रमांक लागतो. राज्यात महावितरणचे 2 कोटी 8 लाख घरगुती ग्राहक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.