आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुण्यातील ताडीवाला रस्ता येथे राहणाऱ्या ज्योती कांबळे (वय ४२) यांच्या घरात लॉक दुरुस्तीच्या नावाखाली शिरलेल्या दोनजणांनी घरातील दागिने व रोख रक्कम लंपास केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी नंदुरबार येथून आरोपी प्रधानसिंग ऊर्फ बख्तावरसिंग शिकलीकर (वय ४१) व एक विधीसंघर्षग्रस्त मुलास ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अशी केली चोरी
पोलिस उपआयुक्त सागर पाटील यांनी सांगितले, आंतरराज्यीय गुन्हेगारांची टोळी जेरबंद करण्यात बंडगार्डन पोलीसांना यश आले आहे. त्यांच्या ताब्यातून १५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व दोन लाख रुपये रोख जप्त केले आहे. २६ जुलै रोजी ज्योती कांबळे या तक्रारदाराने घरातील कपाट दुरुस्तीसाठी चावीवाल्यांना बोलवले होते. त्यावेळी चोरटयांनी त्यांना सामान आणण्यास पाठवून दागिने व पैसे लंपास केले होते.
सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे तपास
सीसी टीव्ही फुटजेच्या आधारे पोलिस आरोपींचा शोध घेत होते. महाराष्ट्र व गुजरात मधील तपास पथकांना याबाबतची माहिती देण्यात आली होती. बंडगार्डनचे पोलीस नितीन जगताप यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढत गुजरात मधील त्यांच्या ओळखीच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना संबंधीत सीसीटीव्ही फुटेज पाठवले. त्यानुसार आरोपींचे नाव निष्पन्न होऊन ते नंदुरबार येथील असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे पोलीस उपनिरीक्षक राहूल पवार यांचे पथक नंदुरबारला गेले. त्याठिकाणी स्थानिक पोलिसांची मदत घेऊन दोन आरोपींचा शोध घेऊन त्यांना जेरबंद करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते, पीएसआय राहुल पवार, पोलीस अंमलदार नितीन जगताप, अनिल कुसाळकर, संजय वणवे, किरण तळेकर, ज्ञाना बढे, सागर घोरपडे, मनोज भोकरे, सतिष मुंढे, शिवाजी सरक यांचे पथकाने कारवाई केली आहे.
जमिनीत पुरलेले दागिने, रोकड
आरोपींकडील चौकशी दरम्यान त्यांनी गुन्हयातील १५ तोळे सोने व दोन लाख रुपये रोकड त्यांच्या राहत्या घरामागे जमीनीत पुरल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरोधात गुजरात राज्यात विविध ठिकाणी सात घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. आरोपी विशिष्ट प्रकारे चोरी करत असून ते वेगवेगळया भागात जाऊन लॉक दुरुस्ती, चावी बनविण्याचे काम करतात. त्याठिकाणी राहून ते विविध जागेवरील घरात लॉक दुरुस्तीची विचारणा करुन घरात प्रवेश करतात. नंतर काही सामान आणण्यासाठी घरातील व्यक्तींना घराबाहेर पाठवले जाते. सदर वेळेत घरातील कपाटाचे लॉक तोडून किंवा चावी बनवून मुद्देमाल घेऊन पसार होत होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी दिली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.