आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोला:आमदार सांभाळण्यात सरकारचा वेळ वाया जातो : जयंत पाटील

पुणे23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील अनेक गुंतवणुकीचे उद्योग प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. महाराष्ट्रातून जे प्रकल्प राज्याबाहेर गेलेले आहेत ते परत आणण्यासाठी सध्याचे राज्य सरकार कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही. त्यांचा वेळ केवळ त्यांच्या समर्थक आमदार सांभाळण्यातच जात असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी लगावला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहरतर्फे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात नवी पेठ येथील लालबहादूर शास्त्री रस्ता या ठिकाणी निषेध आंदोलनावेळी ते बाेलत होते. या वेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, युवक कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अजिंक्य पालकर, रूपाली ठोबरे, वेणू शिंदे उपस्थित होते.

पाटील म्हणाले, राज्यातील पोलिस भरती संदर्भातील निर्णय राज्य सरकारने तातडीने घेऊन तरुणांना दिलासा द्यावा. केवळ महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णय रद्द करून सरकार राज्याला अधोगतीकडे नेत आहे. ७५ हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, हे राज्य सरकार सांगत असले तरी ती केवळ तरुणांच्या डोळ्यात धूळ फेक करणारी कृती आहे. राज्यातील पुणे, अहमदनगर, सातारा, नाशिक आदी भागातील गुंतवणुकीचे मोठे प्रकल्प निर्माण झाले असते तर मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्धता झाली असती. मात्र, सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. राज्यातील नवतरुणांची, सुशिक्षितांची त्यामुळे निराशा झालेली आहे. त्याचप्रमाणे राज्याचे अतोनात आर्थिक नुकसान झाले असून तरुणांनी राज्य सरकारला या संदर्भात माफ करू नये. तरुणांनी ताकदीने राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारविरोधात आवाज उठवावा आणि आंदोलन करावे.

बातम्या आणखी आहेत...