आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला:कायदा सुव्यवस्थेसाठी शस्त्र बाळगण्याबाबत निर्बंध कायदा लागू

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे जिल्ह्यातील ६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात फौजदारी दंड प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 तसेच शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 17(3)(ए) व (बी) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्बंध लागू केले आहेत. पोटनिवडणूक सुरळीत, शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून 22 सप्टेंबरर्पंत हे निर्बंध राहणार आहेत.

पुणे जिल्ह्यातील सार्वत्रिक निवडणूक झालेल्या 61 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीची आचारसंहिता अमलात असून 18 सप्टेंबरला मतदान तर 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. तसेच निकाल अंतिमरित्या जाहीर करण्याची तारीख 22 सप्टेंबर अशी असून या तारखेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे.

22 सप्टेंबरपर्यंत शस्त्रे बाळगण्यास मनाई

या कालावधीत नागरिकांना स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे, हत्यारे, दारुगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी नेमण्यात आलेले सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्यावर निवडणूक कालावधीत त्यांच्याकडील हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची जबाबदारी राहील.

शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश

जामिनावर सोडलेल्या व्यक्ती, दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती व निवडणूक कालावधीत दंग्यामध्ये गोवलेल्या व्यक्ती तसेच राजकीय हितसंबंधातून शस्त्रांचा गैरवापर होऊ शकतो अशा १३ शस्त्र परवानाधारकांकडून शस्त्रे जमा करुन घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे ग्रामीण पोलीसांना दिले आहेत.

यामध्ये जुन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 6, घोडेगाव 4, खेड 1 आणि ओतूर पोलीस ठाणे हद्दीतील 2 शस्त्र परवानाधारकांचा समावेश आहे. 22 सप्टेंबरनंतर 7 दिवसांच्या आत संबंधितांना शस्त्र परत करावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मतमोजणी केंद्राच्या परिघात प्रतिबंधात्मक आदेश

61 ग्रामपंचायतीसाठी 18 सप्टेंबर मतदानाचा दिवस ते 19 सप्टेंबर रोजी मतमोजणीचा दिवस या कालावधीत मतदान केंद्र तसेच दिवशी मतदान केंद्राच्या परिघापासून 100 मीटर सभोवतालच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित दिवशी या परिसरातील टपऱ्या, स्टॉल, दुकाने, वाणिज्यिक आस्थापना आदी तत्सम बाबी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान कायदा कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र राहील, असेही जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...