आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैविध्यपूर्ण रथ आणि पालखीतून श्रीं चे विसर्जन होणार:ढोलताशांच्या निनादात गणरायाला निरोप देण्यासाठी मंडळे सज्ज

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निर्बंधमुक्त गणेशोत्सव उत्साहात साजरा झाल्यानंतर आता गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणुकीचे वेध लागले आहेत. अनंत चतुर्दशीला शुक्रवारी (9 सप्टेंबर) सकाळी मंडईतील टिळक पुतळा येथून सकाळी सुरू होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. दोन वर्षांच्या खंडांनंतर गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत.

कसबा गणपती मंडळ

ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीमध्ये नगारखाना, आर्ट ऑफ लिव्हिंग, प्रभात बँड, कामायनी प्रशाला, बँक ऑफ इंडिया आणि रोटरी क्लबची पथके असतील. रमणबाग, रुद्रगर्जना आणि कलावंत ही तीन ढोल-ताशा पथके सहभागी होणार आहेत.

तांबडी जोगेश्वरी मंडळ

श्री तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणपती मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी सतीश आढाव यांचा नगारावादनाचा गाडा आणि न्यू गंधर्व बँडपथक असेल. समर्थ प्रतिष्ठान, शिवमुद्रा आणि ताल ही ढोल-ताशा पथके तसेच विष्णूनाद हे शंखवादकांचे पथक, पारंपरिक पेहरावातील अश्वारूढ कार्यकर्ते मिरवणुकीमध्ये असतील.

गुरुजी तालीम मंडळ

मानाच्या तिसऱ्या गुरुजी तालीम मंडळाच्या गणपतीच्या मिरवणूक सरपाले बंधू यांनी साकारलेल्या भक्तीरथातून निघणार आहे. या रथावर फुलांच्या सजावटीसह विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांची प्रतिकृती असणार आहे. मिरवणुकीच्या अग्रभागी जयंत नगरकर यांचा नगारावादनाचा गाडा असेल. गर्जना आणि नादब्रह्मची दोन पथके अशी तीन ढोल-ताशा पथके वादन करणार आहेत.

तुळशीबाग मंडळ

फुलांच्या आकर्षक सजावटीने साकारलेला श्री गजमुख रथामध्ये तुळशीबाग मंडळ या मानाच्या चौथ्या गणपतीची मिरवणूक निघेल. लोणकर बंधूचा सनई आणि नगारावादन अग्रभागी असेल. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त साकारलेला विशेष रथ त्यामागे असेल. स्व-रूपवर्धिनी, गजलक्ष्मी आणि गजर ही तीन ढोल-ताशा पथके असतील.

केसरीवाडा गणपती

केसरीवाडा गणपती या मानाच्या पाचव्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकी बिडवे बंधू यांचा नगारावादनाचा गाडा असेल. श्रीराम, शिवमुद्रा, वज्र या ढोल-ताशा पथकांचे वादन होणार आहे. फुलांनी सजवलेल्या मेघडंबरी रथामध्ये गणरायाची मूर्ती विराजमान होणार आहे.

अखिल मंडई मंडळ

अमोघ त्रिशक्ती नाग रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची विसर्जन मिरवणूक निघेल. विशाल ताजणेकर यांनी रथाचे कलादिग्दर्शन केले असून विविधरंगी प्रकाशझोतामध्ये रथ उजळून निघेल. मिरवणुकीमध्ये सनई-चौघडाचा गाडा, गंधर्व बँड तसेच शिवगर्जना वाद्य पथकासह दोन ढोल-ताशा पथके सहभागी होतील.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

दाक्षिणात्य पद्धतीच्या रचनेमध्ये साकारण्यात आलेल्या श्री स्वानंददेश रथातून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची मिरवणूक निघणार आहे. एलईडी व मोत्याच्या रंगाच्या दिव्यामध्ये हा रथ साकारण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...