आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंपांवर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद:साखरेच्या खरेदी-विक्रीत तोटा झाल्याने आरोपी बनला दरोडेखोर, 2 साथीदार फरार

पुणे13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे-अहमदनगर रस्त्यावर शिरुर तालुक्‍यात सलग दोन पेट्रोल पंपांवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या टाेळीतील एक जण साखरेच्या धंद्यात ताेटा झाल्याने चाेरी आणि दराेडे टाकण्याकडे वळला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. करण पठारे(२०,रा.गुजरमळा, शिरुर), रोहन कांबळे (२०, रा.बोऱ्हाडेमळा, शिरुर), अजय माळी(२३,रा.श्रीगोंदा) आणि अजय सोमनाथ लकारे (२१, रा.श्रीगोंदा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार झाले आहेत.

टोळीचा मुख्य सूत्रधार करण पठारे आहे. तो शिरुर परिसरातच रहाणारा असून त्याचा साखर खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. यामध्ये त्याला सात ते आठ लाखांचे नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी त्याने वीटभट्टी कामगार असलेले लकारे आणि माळी तसेच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या कांबळेला हाताशी धरले. याव्यतिरिक्त आणखी दोन साथीदारांना घेऊन त्याने दरोड्याचा कट रचला. तो शिरुरमध्ये राहणारा असल्याने त्याने १२ नोव्हेंबरला श्री शिवसाई फ्युएल स्टेशन हा शिरुरमधला पेट्रोल पंप लुटला.

येथे कोयत्याचा धाक दाखवून ४९ हजारांची रोकड चोरली. यानंतर १५ नोव्हेंबरला न्हावरा गावच्या हद्दीतील आयओका पेट्रोल पंपावर दरोडा टाकून १ लाख २ हजारांची रोकड चोरली. सलग दोन दरोडे एकाच तालुक्‍यात पडल्याने पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलिसांची पथके तयार केली. त्यांनी तांत्रिक माग व खबऱ्यांकडून माहिती मिळवून चौघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेले कोयते हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांच्या इतर दोन साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा तपास शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत करत आहेत.

पेट्राेल पंपचालकांनी खबरदारी घ्यावी
पेट्रोल पंपावरील कर्मचारी थंडी वाढल्याने केबिनमध्ये झोपतात. ग्राहक आल्यास पटकन जाता यावे म्हणून केबिनचे दार उघडेच ठेवतात. यामुळे दरोडेखोर थेट केबिनमध्ये घुसून लूटमार करतात. यामुळे थंडीच्या दिवसांत दरोडेखोरांची कार्यपद्धती लक्षात घेऊन पेट्रोल पंपचालकांनी दक्षता घ्यावी.
- अंकित गोयल, पोलिस अधीक्षक, पुणे ग्रामीण

बातम्या आणखी आहेत...