आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआरोग्य भरती परीक्षेचा ‘ड’ गटाचा पेपर व्हाॅट्सअॅपवर व्हायरल झाल्यानंतर पुणे सायबरकडे याबाबत तक्रार आली आणि पोलिसांच्या जाळ्यात छोट्या माशांपासून मोठे मासे गळाला लागले. गट ‘क’ आणि ‘ड’ परीक्षेचा पेपर सेट करणाऱ्या समितीतील तांत्रिक सहसंचालक महेश बोटले याने वरिष्ठांना अंधारात ठेवत परस्पर झटपट पैसे कमावण्यासाठी पेपर फोडण्याचे षड्यंत्र रचले. दोन्ही पेपर त्याने फोडले आणि लातूरचा आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेकडे सुपूर्द केले. यातून बडगिरे याच्याजवळ ३० लाख रुपये जमा झाले होती. मात्र, बोटलेने प्रकरण शांत झाल्यानंतर मुंबईला येऊन त्याची रक्कम देण्याचा निरोप बडगिरेला दिला होता. परंतु, पोलिसांची सूत्रे या प्रकरणात वेगाने फिरली आणि बोटले पैसे मिळण्यापूर्वीच जेरबंद झाला. बोटले याने पेपरफुटीचे षड्यंत्र रचताना बिंग फुटले जाणार नाही याची आवश्यक ती खबरदारी घेतली होती. त्याप्रमाणे बडगिरे यांनी त्यांचा वाहनचालकास मुंबईतून बोटलेच्या कार्यालयातून एक महत्त्वाचे ‘टपाल’ घेऊन ये, असे सांगितले होते. त्यानुसार वाहनचालक मुंबईला बोटलेच्या कार्यालयात गेला होता. त्या ठिकाणी बोटले याने बडगिरे याच्याशी फोनवर खातरजमा करून संगणकातून गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचा पेपर पेनड्राइव्हमध्ये टाकून सीलबंद पाकिट शिपायामार्फत चालकास दिले.
सुरुवातीला केवळ एकाच परीक्षेचा पेपर दिला गेला. मात्र, काही क्षणांतच बोटले व बडगिरे यांच्यात पुन्हा संपर्क होऊन दुसऱ्याही परीक्षेचा पेपर पेनड्राइव्ह देण्यात आला. मात्र, चालकास याबाबत माहिती नव्हती. बडगिरेला पेपर मिळाल्यानंतर त्याने सैनिक, पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण अकॅडमींशी संपर्क साधत त्यांना पेपर पुरवला जाईल, असे सांगत प्रत्येक विद्यार्थ्याकडून सहा ते साडेसहा लाख रकमेची मागणी केली. जी रक्कम बडगिरे याच्याकडे जमा होईल, त्यातील अर्धी रक्कम बोटले यास दिली जाणार होती.
आठ प्रश्न शिल्लक ठेवून पेपर फोडला
बोटले पेपर सेट करणाऱ्या समितीत असल्याने त्याला अंतिम पेपर माहिती होता. त्याने महिनापूर्वीच परीक्षेचा १०० गुणांपैकी ९२ प्रश्नच पेनड्राइव्हमधूनन बडगिरेला दिले. प्रकरण उघड होऊ नये याकरिता थोड्याच विद्यार्थ्यांना पेपर दे, अशी तंबीही दिली. १०० मार्क्सचा पेपर देऊन परीक्षार्थींना पूर्ण मार्क्स मिळाले तर कुणालाही संशय येऊ शकतो, त्यामुळे ८ प्रश्न शिल्लक ठेवून उर्वरित पेपरच फोडण्यात आला. बडगिरेला बीडचा वैद्यकीय अधिकारी डाॅ.संदीप जोगदंड याच्याकडून १० लाख रुपये, श्याम मस्के (बीड)कडून ५ लाख रुपये, नामदेव करांडेकडून ८ लाख रुपये, उमेश मोहितेकडून २ लाख रुपये आणि आणखी एका फरार आरोपीकडून ५ लाख रुपये असे एकूण ३० लाख रुपये मिळालेले आहे. करांडेची बहीण बडगिरेच्या कार्यालयात क्लार्क म्हणून काम करत असून त्या माध्यमातून त्याची आेळख झालेली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.