आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भाजपचा बालेकिल्ला ढासळला असून महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. या पराभवाची जबाबदारी हेमंत रासने यांनी घेतली आहे.
या पराभवानंतर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांनी सांगितले की, निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आणि नेत्यांनी मला पाठबळ दिले. आणि मदत केली. मात्र, आजच्या पराभवाची जबाबदारी मी घेत असून आगामी काळात मतदारांचा विश्वास पुन्हा संपादित करेल.
रासने म्हणाले, पूर्वी कसबा विधानसभा मतदारसंघ हा एक लाख मतदारांचा मतदारसंघ होता. मात्र मतदारसंघ पुनर्रचनेनंतर तो तीन लाखांचा करण्यात आला.
त्यानंतर प्रथम सन 2009 मध्ये निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीमध्ये भाजपाचे गिरीश बापट यांना 54 हजार मते मिळालेली होती. तर काँग्रेसचे रोहित टिळक यांना 46 हजार मते मिळालेली आणि मनसेचे रवींद्र धांगेकर यांनाही तितकीच मते मिळालेली होती. त्यानंतरच्या निवडणुकांमध्ये असेच चित्र दिसून आले.
मला अपयश आले
यंदा प्रथमच तिरंगी, चौरंगी अशी लढत न होता, दुरंगी लढत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात झाली. त्याचा परिणाम निवडणूक निकालात दिसून येत आहे. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर मला पक्षाने विश्वास दाखवून अधिकृत उमेदवारी दिली. त्यानंतर मी माझी जबाबदारी पार पाडत होतो. मात्र, पुरेसा मतदारांचा कौल मिळवण्यात मला अपयश आले आहे.
सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप
भाजपवर महाविकास आघाडी आणि त्यांचे उमेदवाराकडून वेळोवेळी पैसे वाटप केल्याचा, ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड केल्याचा, नेत्यांकडून सत्तेचा गैरवापर केल्याचा असे विविध आरोप करण्यात आले.
याबाबत रासने म्हणाले, बिनबुडाचे आरोप करून भाजपला बदनाम करण्याचे षडयंत्र या निवडणुकीत महाविकास आघाडीने केलेले आहे. भाजपची यंत्रणा घरोघर पोचली होती मात्र मी कुठेतरी कमी पडलो असे दिसून येत असून त्याबाबत मला आत्मचिंतन करावे लागणार आहे. आजचा निकाल माझ्यासाठी धक्कादायक असून या निवडणुकीत विजय मिळेल अशी खात्री मला होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.