आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उच्च पदावरील व्यक्तींनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करावा

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माणसाच्या चांगल्या कृतीतूनच संस्कृतीची निर्मिती होत असते. देशाची सेवा नि:स्वार्थपणे केली पाहिजे. व्यक्ती-व्यक्तींमध्ये कनिष्ठ-वरिष्ठ असा भेदभाव न करता त्यांच्या चांगल्या गुणांचा सन्मान करण्याची आपली परंपरा आहे. विविध क्षेत्रात मोठमोठ्या पदावर कार्यरत असणाऱ्यांनी भारतीय संस्कृतीचा प्रसार करायला हवा, आणि यशाच्या शिखरावर असतानाही आपल्या मातृभूमीला विसरता कामा नये. तसेच आपण आपल्या मातृभाषेतूनच बोलले पाहिजे, असे मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.

भुकुम येथील संस्कृती शाळेच्या वतीने देण्यात येणाऱ्या ‘संस्कृती पुरस्कार-२०२२’ वितरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. राज्यपाल कोश्यारी म्हणाले, ‘आपण आपल्या संस्कृतीचा आदर बाळगला पाहिजे. आईवडील, शिक्षक आणि देशाची सेवा करावी आणि त्यांचा आदर ठेवावा. सांस्कृतिक मूल्य जोपासल्याने आपल्या क्षेत्रात प्रगती साध्य करता येईल. आपल्या क्षेत्रात चांगले विचार घेऊन मार्गक्रमण केल्यास यश निश्चित मिळेल. शैक्षणिक जीवनात महत्त्वाकांक्षा बरोबरच एक ध्येय समोर ठेवून पुढील वाटचाल करत राहा. भारतीय संस्कृतीचा देश-विदेशात प्रचार करण्याच्या कामी संस्कृती शाळा मॉडेल ठरेल, तसेच या शाळेतून विविध क्षेत्रात कामगिरी करणारे उत्तम नागरिक निर्माण होतील, असा विश्वास कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केला.’ यावेळी व्हाइस ॲडमिरल अजय कोच्चर, संस्थापिका देवयानी मुंगली, विश्वस्त कॅ. गिरिजाशंकर मुंगली, अनुज मुंगली व प्रणित मुंगली, प्राचार्या दामिनी जोशी उपस्थित होते.

उत्कृष्ट राष्ट्रीय सेवेबद्दल अॅडमिरल कोचर यांचा गौरव
उत्कृष्ट राष्ट्रीय सेवेबद्दल राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट व्हाइस ॲडमिरल अजय कोचर यांना सन्मानित करण्यात आले. जहांगीर रुग्णालयाचे अध्यक्ष एच. सी.जहांगीर (आरोग्य), लेखिका नमिता गोखले (साहित्य), आमदार सिद्धार्थ शिरोळे (प्रशासन), ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजित डिसले आणि शिक्षणतज्ज्ञ कमला इदगुंजी (शैक्षणिक), मिरर नाऊचे सहसंपादक मंदार फणसे आणि सकाळचे संपादक सम्राट फडणीस (पत्रकारिता), नेमबाज प्रियेशा देशमुख (क्रीडा) यांना राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...