आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हातोबाच्या नावानं चांगभलं:हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर हिंजवडी आयटी पार्कमधून निघणार बगाड मिरवणूक, 388 वर्षांची परंपरा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर हिंजवडी आयटीपार्कमधून श्री म्हातोबा देवाची बगाड मिरवणूक आज दुपारी चार वाजता सुरू होणार आहे. 1635 पासून ही बगाड मिरवूणक निघते. कोरोना काळ वगळता गेली 388 वर्ष ही परंपरा कायम आहे.

हनुमान जयंती आधी हिंजवडी व वाकड ग्रामस्थ 10 दिवस उपवास करतात. हनुमान जयंतीला दुपारी चार वाजता हिंजवडी गावाठाणातून वाकडच्या दिशेने बगाड मिरवणूक निघते. मिरवणूक पाहण्यासाठी व दर्शनासाठी मुळशी तालुका, पिंपरी चिंचवड शहरासह पुणे जिल्ह्यातील भाविक मोठ्या संख्येने गर्दी करतात. मिरवणुकीसाठी हनुमान जयंतीच्या 10 दिवस आधी देव बसतात. वाकड-हिंजवडी ग्रामस्थांचा उपवास सुरू होतो. या 10 दिवसांत प्रत्येकाच्या घरी देवाची पूजा होत नाही. लग्न, साखरपुडा, वास्तूशांती सारखे कार्यक्रमही होत नाही. या काळात सर्व काही वर्ज्य असते. बगाडाला नैवद्य दाखवूनच उपवास सोडला जातो.

म्हातोबा देवाची गावजत्रा आजपासून 6 एप्रिलपासून हिंजवडीसह वाकड गावात सुरू होत आहे. त्यानिमित्त ही बगाड मिरवणूक काढली जाते. श्री म्हातोबा देवाचे अस्तित्व वाकड हिंजवडी या दोन्ही गावात असल्याने दोन्ही गाव मोठ्या श्रद्धेने उत्सव साजरा करतात. बगाडाची उभारणी करण्याच्या मान वाकड- हिंजवडी गावातील सुतार कारागिराचा असतो. पारंपारिक पद्धतीने सुतार व ग्रामस्थांच्या मदतीने बगाडाची उभारणी करण्यात येते.

खरे तर हिंजवडी व वाकड ही दोन्ही गावे आता शहरे झाली आहेत. हिंजवडी तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे आयटी पार्क म्हणून ओळखले जाते. तरीही गावपण कायम राखून बगाड सोहळ्याची ऐतिहासिक परंपरा येथील स्थानिकांनी जोपासली आहे. त्यामुळे आज बगाड मिरवणुकीनिमित्त आयटी पार्क दुमदुमणार आहे. आता परिसरातील आयटीयन्सनाही या उत्सवाची चांगलीच भुरळ पडली आहे.

हिंजवडी वाकड मध्ये शहरीकरण झाले असले तरी येथील शेकडो शेतकर्‍यांनी आवड म्हणून घरी खिल्लारी बैल पाळले आहेत. यातील काहीजण बैलगाडा शर्यतीत तर काहीजण पंढरपूर च्या पायी वारीतील रथाला आपल्या बैलजोड्या जुंपतात. मात्र न चुकता सजवलेल्या बैलजोड्या बगाड मिरवणूक रथाला जोडल्या जातात. या पारंपरिक सोहळ्यात स्थानिक भविकांसोबत आयटी अभियंते मोठ्या हिरारीने सहभागी होतात.