आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी केल्याने चौकशी होत नाही:कुणी काहीही मागणी केल्यावर सीबीआय चौकशी होत नसते, त्याला राज्य सरकारची परवानगी लागेल, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे भाजपला प्रत्युत्तर

पुणेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सकाळी धाड टाकली. तत्पूर्वी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत अजित पवारांच्या विरोधात सीबीआय चौकशीची मागणी करणारा ठराव मांडण्यात आला. या संपूर्ण प्रकणावर आता राज्याचे विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया जारी केली. कुणीही काहीही मागणी केल्याने सीबीआय चौकशी होत नसते असे गृहमंत्री म्हणाले आहेत.

कुणी मागणी केल्याने चौकशी होत नाही

भाजपच्या मागणीवर गृहमंत्री पाटील यांनी संताप व्यक्त केला. गृहमंत्री म्हणाले, "चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. प्रत्यक्षात कोरोनाची परिस्थिती असताना सर्वांचे लक्ष त्यावर असायला हवे. तपासाबद्दल बोलायचे झाल्यास मी याबाबत जास्त बोलू इच्छित नाही. संबंधित तपास यंत्रणा आपले काम करत आहेत. पण, यात कुणी काहीही मागणी केली तरी सीबीआय चौकशी होत नसते. यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल."

भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मांडला ठराव.
भाजप राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत मांडला ठराव.

भाजपने मांडला सीबीआय चौकशीचा ठराव
अनिल देशमुख, संजय राठोड यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर भाजपने आपला मोर्चा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वळवला असून परमबीर प्रकरणात अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत गुरुवारी तसा ठराव करण्यात आल्यामुळे भाजपचे पुढील लक्ष्य हे अजित पवार असतील याचे संकेत मिळाले आहेत. कार्यकारिणीच्या बैठकीत ओबीसींच्या राजकीय आरक्षणप्रश्नी राज्यभर आंदोलन छेडण्याचाही निर्णय घेण्यात आला.

अजित पवार दुखरा कोपरा

दीड वर्षापूर्वी भाजपने अजित पवार यांच्या साथीने पहाटे पहाटे सरकार स्थापन केले होते. मात्र आता अजित पवार यांच्या चौकशीची मागणी केल्याने ते भाजपपासून दुरावल्याचे मानले जाते. विशेष म्हणजे अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीचा कार्यकारिणीत ठराव झाला. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली. फडणवीस यांनीही अँटिलियाप्रकरणी वाझेचा उल्लेख केला, मात्र अजित पवारांवर टीका केली नाही.

अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ!

दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांची पदावन्नती झाली. त्यानंतर त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात 100 कोटी रुपयांची वसूली दरमहा करण्याचे आदेश दिले होते असे आरोप केले. त्याच प्रकरणात मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार, सीबीआयने गुन्हा दाखल केला. त्यानुसार, ईडीने तपास आणि धाड सुरू केल्या. त्याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांचे नागपुरातील घर गाठले आहे.

बातम्या आणखी आहेत...