आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:चीनचा बहिष्कार करताना ते उद्योग भारतात वळवण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा ते इतर देशांकडे जातील; यासाठी रोडमॅप तयार व्हायला हवा

पुणे2 वर्षांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
  • महाराष्ट्र फिक्की संघटना अध्यक्ष उद्योजिका सुलज्जा फिरोदिया यांच्याशी खास बातचीत

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन लागू करण्यात आले. यामुळे उद्योगधंदे ठप्प झाल्याने रोजगार गमावलेले लाखो स्थलांतरित मजुरांचे जत्थे त्यांचे मूळ गावी परतू लागल्याचे भयवाह चित्र निर्माण झाले. देशभरातील मोठ्या नामांकित कंपन्यांवर  याचा अनिष्ट परिणाम झाला असून कोविड पश्चात बाजारातील उत्पादन मागणी कमी झाल्याने तंत्रज्ञानाच्या मदतीने व्यवसायात नवीन बदल करून यापुढील काळात सामोरे जावे लागणार आहे. यापार्श्वभूमीवर ई-वाहनांचे उत्पादन करणाऱ्या कायनेटिक ग्रीन एनर्जीं अँड पॉवर कंपनीच्या संचालिका आणि महाराष्ट्र फिक्की संघटना अध्यक्ष उद्योजिका सुलज्जा फिरोदिया यांच्याशी करण्यात आलेली बातचीत..

प्रश्न - लॉकडाऊनचा कशाप्रकारे परिणाम व्यवसायवर झाला असून तातडीने देशभरात लॉकडाऊन लागू करणे योग्य होते का?

फिरोदिया - आपला देश आणि लोकसंख्या मोठी असून तातडीने लॉकडाऊन लागू करण्यापेक्षा किमान तीन ते चार दिवसांची पूर्वकल्पना देणे आवश्यक होते.तातडीने लॉकडाऊन लागू केले नसते तर रुग्णसंख्या वाढली असती हे सरकारचे सांगणे योग्य आहे पण लॉकडाउनला सामोरे जाण्याची परिस्थिती उद्योगांची नव्हती. उद्योग याकाळात बंद राहिले आणि त्याचा कंपनीच्या अर्थकारणावर परिणाम झाला आहे. अनेक स्थलांतरित कामगाराना मूळगावी परतण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. उद्योग पुन्हा सुरू करण्याची परवानगी मिळाली असली तरी आद्यप निम्मे मनुष्यबळ आधारेच कामकाज सुरू आहे.  

प्रश्न - लॉकडाऊन नंतरच्या परिस्थितीत कामकाजात कशाप्रकारे बदल केले असून नवीन कामकाज प्रणाली कर्मचाऱ्यांनी स्वीकारली आहे का?

फिरोदिया - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अनेक कंपनीच्या कामकाजात बदल झाले आहेत. आर्थिक मंदी सदृश्य परिस्थितीमुळे बाजारात ऑटोमोबाईल उत्पादन मागणी कमी झाल्याने आणि वाहने खरेदी करिता बँक कर्ज देत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे ग्राहकांच्या हातात पैसे नसल्याने डीलर व्यवसाय करू शकत नाही. अशाप्रसंगी सरकारने त्यांचे रस्ता,मनरेगा याप्रकारच्या  पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू करून रोजगार निर्मिती केली पाहिजे तसेच बँकांनी पुढाकार घेऊन नवीन कर्ज योजना सादर कराव्यात. सामान्य नागरिकांच्या हातात पैसे आले तरच अर्थव्यवस्थाला पुन्हा गती मिळू शकते. लॉकडाऊन मध्ये आम्ही बसून राहिलो नाहीतर यापुढील काळात मागणी कोणती राहील, किफायतशीर दर कसा असेल याप्रकारे कामाची पुनर्रचना केली. दैनंदिन कामात आम्ही बदल केला असून डिजिटल वर्किंगवर भर दिला असून ऑनलाइन बैठका घेत आहे. उत्पादन किंमत कमी करण्या दृष्टीने संशोधन काम करण्यात येत आहे. कंपनीतील लोकांची मानसिकता टिकवून ठेवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाते आहे.

प्रश्न - बाजारातील उत्पादन मागणी कमी झाल्याने आणि कोरोना पासून बचाव करण्यासाठी कोणती नवीन उत्पादने कायनेटिकने सुरू केली आहेत?

फिरोदिया - सार्वजनिक ठिकाणे, झोपडपट्ट्या, मोठ्या औद्योगिक वसाहती, रुग्णालये, कारखाने आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये निर्जुंतुकीकरण करण्यासाठी कंपनीने ई-फॉगर आणि ई-स्प्रेअर या उत्पादनांची श्रेणी उपलब्ध करून दिली असून रुग्णालयांतील खोल्या, कचेऱ्यांतील खोल्यांमध्ये निर्जंतुकीकरणासाठी उपयुक्त असे पोर्टेबल यूव्ही सॅनिटायझर हे उत्पादन बाजारात आणले आहे. स्प्रेईंग किंवा फॉगिंगसाठी कायनेटिकने 'सफर' नावाचे तीन-चाकी बॅटरीवर चालणारे इलेक्ट्रिकवरील वाहन तयार केले आहे. हे वाहन संपूर्ण भारतीय बनावटीचे आहे. दाटीवाटीच्या लोकवस्त्या, लहान-लहान गल्‍लीबोळ, ज्या भागांत मोठे वाहन घेऊन अवघड जाते किंवा वेळखाऊ ठरते तसेच या भागांत पायी फिरून फवारणी केली तरी ती उपयोगी ठरत नाही, असे शहरांच्या जुन्या वस्त्यांतील भाग या सर्व ठिकाणी कंपनीची नवी ई-वाहने सहज जाऊ शकतात. ई-सायकलची निर्मिती ही आम्ही केली असून कोरोना काळात बॅटरीवर 40 किलोमीटर पर्यंत सुरक्षित प्रवास त्याद्वारे करता येऊ शकेल.सरकारने विदार्थिनी, गरीब लोक यांना कल्याणकारी योजना मार्फत या ई सायकल उपलब्ध करून द्यावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

प्रश्न - कोरोना नंतरच्या काळात सरकारकडून कोणत्या अपेक्षा आहेत?

फिरोदिया - सरकारकडे विविध कंपन्यांचे त्यांनी केलेल्या कामाचे आणि जीएसटी रीफंड, फेमा सबसिडीचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत ते सरकारने उद्योगांना लवकर द्यावेत म्हणजे या परिस्थितीत उद्योग तग धरू शकतील.  भारतीय अर्थव्यवस्थावर कोरोनामुळे साडेचार ते पाच टक्कायपर्यंत परिणाम होणार असल्याचे दिसून येत आहे ऑटोमोबाईल क्षेत्रात मागील वर्षीपासून मागणी कमी झाल्याचे जाणवत आहे.

प्रश्न - चीन सोबतच्या तणावामुळे व्यवसायावर काही परिणाम झाला आहे का? आपल्या सरकारने कोणती पावले उचलणे आवश्यक आहे?

फिरोदिया - चीन वरील निर्भरत्व आपण कमी केले पाहिजे आणि 'मेक इन इंडिया'ला प्राधान्य दयावे लागेल. चीन मधून आपण 70 बिलियन डॉलर वस्तूची आयात करतो तर 15 बिलियन डॉलर वस्तूची निर्यात करतो ही तफावत कमी केली पाहिजे. चीन मधून आयात कमी करताना आपली निर्यात वाढविण्यासाठी प्लास्टिक वस्तू, खेळणी, ज्वेलरी, टेक्स्टाईल, फर्निचर असे 10 ते 12 निर्यातक्षम वस्तूचे उत्पादन वाढविण्याकरीता सरकारने लक्ष्य दयावे. त्याकरिता कौशल्य प्रशिक्षण देऊन मनुष्यबळ उपलब्ध केल्यास कंपन्या मध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होऊ शकतील. चीनच्या वस्तूवर बहिष्कार घाला हे अभियान सोशल मीडियावर चालत असताना लोकांचे भावना त्याच्याशी निगडित झाला आहे. चीन मधून बाहेर पडणारे उद्योग आपल्याकडे वळवले पाहिजे अन्यथा ते विह्यातनाम, थायलंड या देशात जातील. कामगार नियमावलीत पुनर्रचना करून नवीन उद्योगांना आवश्यक सोयीसुविधा आणि सबसिडी उपलब्ध करून दयावात. सरकार आणि कंपन्या यांनी एकत्रित येवून पुढील कामाचा रोडमॅप तयार करण्याची गरज आहे आणि पुढील दोन वर्षात देशांतर्गत उत्पादन वाढवण्यावर भर दिला पाहिजे.

बातम्या आणखी आहेत...