आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकौटुंबिक वादातून पत्नी सोबत अघोरी कृत्य करून तसेच तिचा शारीरीक आणि मानसिक छळ केल्या प्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी पतीसह सात जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती बुधवारी दिली आहे.
याप्रकरणी एका पीडित २७ वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर तक्रारी नुसार पती सागर ढवळे, सासू अनिता ढवळे, सासरे बाबासाहेब ढवळे, दीर दीपक ढवळे, मावस दीर विशाल तुपे, भाचा रोहन मिसाळ, महादू कणसे (सर्व मु. रा. बीड) यांच्या विरुद्ध पोलीसानी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या विरुद्ध अनैसर्गिक कृत्य, विनयभंग, शारिरिक मानसिक छळ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम आदी कलमांन्वये पोलिसांकडून गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.
विवाहानंतर पीडित महिला ही बीड जिल्ह्यातील कामखेडा गावात पतीच्या घरी राहत होती. पतीसह नातेवाईकांनी तिचा सातत्याने शारिरिक आणि मानसिक छळ केला. तसेच मासकि पाळी दरम्यान आरोपींनी संगनमत करुन महिलेशी अघोरी कृत्य केले. सततच्या छळामुळे महिला माहेरी निघून आली. त्यानंतर तिने सासरच्या व्यक्ती विरोधात पोलिसांकडे तक्रार दिली आहे.
मार्केटयार्डामध्ये गोळीबार करणार्याला अटक
भाईगिरी मधून दादागिरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत एकावर गोळीबार करुन पसार झालेल्या सराईत आरोपीला मार्केटयार्ड पोलिसांनी अटक केली आहे.
संतोष वामन कांबळे (वय ३५, रा. मार्केटयार्ड ,पुणे)असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.तर प्रशांत गवळी असे जखमी झालेल्याचे नाव आहे. संबंधित घटना सात मार्चला आंबेडकरनगरमध्ये घडली होती.मार्केटयार्डमधील आंबेडकरनगर वसाहत परिसरात प्रशांत गवळी थांबला असताना , घटनेच्या दिवशी दुपारच्या सुमारास आरोपी संतोष कांबळे याच्यासोबत त्याची वादावादी झाली.
या वादातून संतोष कांबळे याने प्रशांत गवळी याच्यावर बंदूकीतून गोळीबार करीत त्यास जखमी केले. त्यानंतर तो पसार झाला होता. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या पथकासह स्थानिक पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला आंबेगाव बुद्रूक परिसरातून ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी पोलीस आयुक्त्त रितेशकुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रंजन कुमार, उपायुक्त विक्रांत देशमुख, एसीपी पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.