आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:एकनाथ खडसे सीडी कधी बाहेर काढणार याचीच वाट पाहतोय : राज ठाकरे यांचा टोला

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत.

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी काही महिन्यांपूर्वी “माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी काढीन,’ असे वक्तव्य केले होते. या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना खोचक टोला लगावत मी त्यांच्या सीडीची वाट पाहतोय, असे म्हटले आहे.

पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणूक आणि नव्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या ईडीची (सक्त वसुली संचालनालय) कारवाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, ‘यंत्रणांचा वापर काँग्रेसच्या कार्यकाळातही असाच करण्यात आला होता. यंत्रणा म्हणजे काही बाहुले नाही की तिचा वापर तुम्हाला नको असलेल्यांना संपवण्यासाठी करावा. हे चुकीचे आहे. त्यामुळेच ज्यांनी गुन्हे केले ते मोकाट फिरत आहेत.’

आरक्षणाचा मुद्दा काँग्रेस पक्षाच्या काळात होता आणि अन्य सरकारच्या काळातही होता. पण या मुद्द्याचे भांडवल करून माथी भडकवायची एवढाच उद्देश आहे का? न्यायालयात बाजू व्यवस्थित मांडली जात नाही. आरक्षण मान्य आहे, मग नेमकं अडलंय कुठं, असा प्रश्न आहे. आरक्षण मोर्चाला सर्व पक्षांचे नेते गेले होते. पण माथी भडकवायची हाच उद्देश दिसतो.

कोरोनामुळे गर्दी होऊ दिली नाही : राज ठाकरे यांचा कार्यक्रम म्हटले की, गर्दी होणारच असे समीकरण असते. मात्र, पुण्यातील कार्यकर्त्याच्या पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला राज यांनी गर्दी होऊ दिली नाही. तशा सूचनाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. तसेच ठाकरे यांनी ज्या वेळी पत्रकारांशी संवाद साधला, त्या वेळी त्यांनी पत्रकार व कार्यकर्ते यांना अंतर राखून बसण्याच्या सूचना केल्या. विशेष म्हणजे राज यांच्यासह त्यांच्या एकाही कार्यकर्त्याने या वेळी मास्क घातला नव्हता.

नवी मुंबई विमानतळावर म्हणाले, माझे नाव राज मोरे होणार नाही
मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य आणि केंद्र सरकारची एकमेकांची जणू ढकलाढकली सुरू आहे. आता लोकांनी राजकीय नेत्यांना याची उत्तरे विचारली पाहिजेत. नाना पटोले यांच्या स्वबळाचा मुद्दा विचारता, “सध्या कोण कुठल्या पक्षात आहेत आणि कोण कुणाचे मित्र आहेत हेच कळेनासे झाले आहे.’ मुंबई विमानतळाच्या नावासंबंधी ठाकरे म्हणाले, “नाव बदलण्याची मागणी मी केली नाही. ठिकाणात बदल झाला की नाव बदलते का? उद्या मी पुण्यात राहायला आलो तर माझे नाव काय राज मोरे होणार नाही. विमानतळाला शिवछत्रपती महाराजांचेच नाव असेल,’ असेही राज म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...