आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रायोगिक रंगभूमीवर लेखक म्हणून तुम्ही तुम्हाला हवे ते मांडू शकता, परंतु व्यावसायिक रंगभूमीवर रसिकांना काय हवे ते मांडायचे असते. त्यामुळे आता चांगले लेखक तयार होत आहेत. त्याचबरोबर रसिकांना खिळवून ठेवण्याची क्षमता कशात आहे हे लेखकाला सांगणे, त्याप्रमाणे नाटक लिहून आणि बसवून घेणे ही दिग्दर्शकाची जबाबदारी आहे, असे मत नाट्य-चित्रपट अभिनेते प्रशांत दामले यांनी गुरुवारी व्यक्त केले.
दामले यांनी १२ हजार ५०० नाट्यप्रयोगांचा विक्रमी टप्पा पार केला आहे. त्यानिमित्ताने श्रमिक पत्रकार संघातर्फे त्यांच्याशी वार्तालाप आयोजित केला होता. या वेळी संघाचे अध्यक्ष स्वप्निल बापट उपस्थित होते. नाटक क्षेत्रातील कंपूशाहीकडे मी नाटकात आल्याच्या पहिल्या दिवसापासून कधीच लक्ष दिले नाही. कायम माझी रेष कशी मोठी होईल आणि लक्ष केंद्रित करून काम करणे आणि ते चांगले करणे याकडे लक्ष दिले, असे दामले म्हणाले. हिंदी चित्रपटात काम करण्याविषयी विचारले असता दामले म्हणाले की, कामाचा आनंद नाटकात मिळतो. कारण माझे आवडीचे “बीट’ नाटक आहे. उगाच हातचे सोडून पळत्याच्या मागे कशाला जायचे? पैसे येथेही मिळतात, मराठी रंगभूमीने मला काहीच कमी पडू दिले नाही. मुळात हिंदी इंडस्ट्रीमध्ये जाण्याची माझीच इच्छा नव्हती. महिनाभर जायचे आणि नाटक बंद ठेवायचे हे मला मान्य नाही. जमलेली टीम मोडणे मला योग्य वाटले नाही. निर्माता म्हणूनही नाटक उभे केले. त्यात आमची टीम चांगली तयार झाली आहे. चित्रपट विषयात सुधारणेला वाव नाही. चित्रपटात कलाकार उत्तरदायी नाही, पण नाटकात कलाकार उत्तरदायी आहे. २२ जणांची टीम असते. त्यांनी एकमेकांच्या चुका झाकल्या तरी नाटक उत्तम होते. राजकारणातील विषयांवर चांगले नाटक लिहिले गेले तर करायला काही हरकत नाही. ५०-६० टक्के लोकांना राजकारणात स्वारस्य नसते. उरलेल्या ३०-३५ टक्के स्वारस्य असलेल्या लोकांसाठी नाटक करणे म्हणजे स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेणे आहे, असेही दामले यांनी या वेळी बोलताना सांगितले.
प्रशासनासाठी नाट्यगृह शेवटचे "ऑप्शन’ कोणत्याही सरकारी प्रशासनासाठी नाट्यगृह हा शेवटचे ऑप्शन असते. त्या नाट्यगृहाला आवाज मिळवून देण्यासाठी काहीतरी करावे लागणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारने यात आता स्वारस्य दाखवले आहे. लवकरच आराखडा तयार होण्याची शक्यता आहे. बालगंधर्व रंगमंदिर नव्याने बांधणार असतील तर ते कधी पूर्ण होणार याची तारीख त्यांनी आधी जाहीर केली पाहिजे. कारण वर्षानुवर्षे अशा वास्तूंचे बांधकाम होत नाही, असे दामले म्हणाले आणि त्यांनी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या आवारातील छोट्या सभागृहाचे काम कित्येक वर्षांपासून झालेच नाही याकडे लक्ष वेधले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.