आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • IAS Amol Awate | Pune Amol Awate Update | Lt Col Amol Awte Felicitated In Pune; Youth Administration Will Be People oriented Avinash Dharmadhikari

पहिल्याच प्रयत्नात IAS:लेफ्टनंट कर्नल अमोल आवटेंचा पुण्यात सत्कार; युवक प्रशासन लोकाभिमुख करतील- अविनाश धर्माधिकारी

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

22 वर्षांच्या लष्कराच्या सेवेनंतर पहिल्याच प्रयत्नात आयएएस उत्तीर्ण होणाऱ्या लेफ्टनंट कर्नल अमोल आवटे यांचा सत्कार पुण्यात रविवारी करण्यात आला. गंगोत्री होम्स अँड हॉलिडेज आणि आवटे कुटुंबीय यांच्या वतीने हा सोहळा पंडित नेहरू सांस्कृतिक सभागृह येथे पार पडला. माजी सनदी अधिकारी आणि चाणक्य मंडल संस्थेचे संस्थापक अविनाश धर्माधिकारी यांच्या हस्ते आणि लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार झाला. मिलिंद कुलकर्णी, मकरंद केळकर यांनी अमोल आवटे यांची मुलाखत घेऊन संवाद साधला.

अमोल आवटे म्हणाले, 'वडीलांच्या नोकरीमुळे राज्यभर अनेक ठिकाणी शिक्षण पूर्ण केले. एनसीसी मधील 3 वर्षांनी प्रेरणा दिली. तिथे 'रिपब्लीकन डे' च्या परेडसाठी मी निवडलो गेलो होतो. बेस्ट कँडीडेट म्हणून मी निवडलो गेलो होतो. त्या प्रेरणेतून मी सैन्यात दाखल झालो. राष्ट्रीय रायफल्समध्ये प्रशिक्षण झाले. राजस्थान, पंजाब,काश्मीर येथे सैन्यदलातील कारवाया तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून कांगो येथे शांतीसेनेतील कार्यात सहभाग घेतला. अतिरेकी कारवायांवर नियंत्रण मिळविताना पायाला गंभीर दुखापत झाली. आंतरराष्ट्रीय संयुक्त सैन्य कारवाईत काम करणे, ही शिकण्याची मोठी संधी असते.

उपयोग प्रशासकीय सेवेत

सैन्यात दाखल होण्याबद्दल युवकांना त्यांनी मार्गदर्शन केले. विविध विद्याशाखांत शिकणाऱ्या युवकांना सैन्याच्या माध्यमातून देशसेवेची चांगली संधी आहे, माजी सैनिकांसाठी काम करणे, हेही सामाजिक काम होऊ शकते. देशसेवा सैन्यात केल्याने जो अनुभव मिळाला, त्याचा उपयोग प्रशासकीय सेवेत करण्यात होणार आहे. सैन्यात प्रत्येक पायरीवर स्वतःला सिद्ध करावे लागते, अभ्यास करावा लागतो. जिद्द, परिश्रमाची तयारी लागते. प्रशासकीय सेवेत टीम वर्कला भर देणार आहे. आयएएस हेच ध्येय्य ठेवून मी अभ्यास केला.

नोट्स काढण्यावर भर

भूगोल विषय घेऊन मी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली. स्वतः नोट्स काढण्यावर भर दिला. नव्या विद्यार्थानी चालू घडामोडींवर भर द्यावा. तंत्रज्ञानाची मदत घ्यावी. माझ्या परीक्षेच्या तयारीच्या दिवसात कुटुंबाचे सहकार्य मिळाले, लष्करी सेवा आणि प्रशासकीय सेवांमधील साम्यस्थळांबद्दल अविनाश धर्माधिकारी यांनी मार्गदर्शन केले, असेही त्यांनी सांगितले.

'राष्ट्र प्रथम' ची शिकवणूक

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) सुदर्शन हसबनीस म्हणाले, 'अमोल आवटे यांचा प्रवास हा उत्कृष्ट सैन्याधिकाऱ्याचा प्रवास आहे. 'लीड फ्रॉम फ्रंट' हा सैन्याचा संदेश घेऊन ते कार्यरत आहेत. अमोल नव्या जबाबदारीत यशस्वी होतील, कारण सैन्याच्या प्रशिक्षणात 'राष्ट्र प्रथम' ची शिकवणूक अंगी बाणलेली आहे.

तर देशाची प्रगती होईल

अविनाश धर्माधिकारी म्हणाले, लोकाभिमुख प्रशासनाचे कर्तव्य मानणारे युवक ही राष्ट्राची संपत्ती आहे. चारित्र्य, समर्पण आणि उत्तरदायित्वाच्या भावनेने प्रशासनात युवक आले तर देशाचे चित्र बदलले जाईल. शुद्ध, पवित्र साधनांनी काम केले तर देशाची प्रगती होईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांना लष्करी सेवेतील अनेक गोष्टी, समज उपयुक्त ठरतात. हृदयात आग आणि डोक्यावर बर्फ ठेवून काम करावे लागते. भविष्यात देशाला पुढील काळात दोन आघाड्यांवर लढावे लागण्याची शक्यता आहे. देशांतर्गत दहशतवादाची आव्हाने देखील समोर येऊ शकतात. अशा वेळी प्रशासकीय सेवेसमोरची आव्हाने पेलायला सज्ज राहावे लागणार आहे.

22 वर्ष अभिमानास्पद सेवा

आंबेगाव तालुक्यातील, आवटे कुटुंबातील सदस्य अमोल शांताराम आवटे यांनी सेनादलामध्ये 22 वर्षांची अभिमानास्पद सेवा बजावल्यानंतर वयाच्या 42व्या वर्षी भारतीय प्रशासकीय सेवेची स्पर्धा परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी होण्याचा बहुमान मिळविला. 29 ऑगस्टपासून ते प्रशिक्षणासाठी मसुरीला जाणार आहेत. तत्पुर्वी हा सत्कार समारंभ पुण्यात आयोजित करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...