आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

75 वीरपत्नींचा विशेष सन्मान:वीरगती प्राप्त सैनिकांना आपण विसरलो तर देशाची सर्वात मोठी हानी -निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले

पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशरक्षणार्थ अनेक सैनिक सीमेवर व देशांतर्गत भागामध्ये वीरगतीला जातात. त्यांची स्मृती राहावे, असे कार्य करणे हे आपण सामान्य नागरिकांचे कर्तव्य आहे. सैनिकांकडून आपण प्रोत्साहन घ्यायला हवे आणि वीरगती प्राप्त झालेल्यांच्या कथा आजच्या तरुणाईला सांगायला हव्यात. वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांना आपण विसरलो, तर देशाची सर्वात मोठी हानी होते, असे मत एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी व्यक्त केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 वीरपत्नींच्या विशेष सन्मान बुधवार पेठेतील कोतवाल चावडी येथे झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी कर्नल संभाजी पाटील, ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, राजाभाऊ पायमोडे, सौरभ रायकर, यतिश रासने, सचिन आखाडे, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, अभिजीत कोद्रे यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. साडी चोळी, सन्मानचिन्ह देऊन वीरपत्नींचा गौरव करण्यात आला.

भूषण गोखले म्हणाले,आजमितीस लेहमध्ये सीमावर्ती भागात 20 हजारपेक्षा जास्त लोक आहेत. तर, चायना गलवान खो-यात देखील अनेक सैनिक लढत आहेत. कोणत्या प्रकारच्या तापमानात हे सैनिक काम करतात, हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळे त्यांची व त्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबियांची आठवण ठेवण्याचे काम आपण करायला हवे. प्रकाश चव्हाण म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त 75 वीरपत्नींचा विशेष सन्मान मंडळातर्फे करण्यात आला.

ज्या वीर सैनिकांनी देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती दिली, त्यांची आठवण आणि जे आजही सिमेवर कार्यरत आहेत, अशांची आठवण ठेवत त्यांच्या कुटुंबियांच्या पाठिशी आपण उभे रहायला हवे. त्यामुळे बांग्लादेश युद्ध, कारगिल युद्धासह विविध लष्करी मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या सैनिकांच्या वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमापूर्वी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात गणरायाचे दर्शन घेत वीरपत्नींनी आरती देखील केली. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...