आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराछत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल मांडलेल्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझी प्रत्येक भूमिका सगळ्यांना पटेलच असे नाही. पण माझी भूमिका चुकीची ठरवणारे हे कोण? असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपला विचारला आहे. दरम्यान, माझे विधान जर तुम्हाला द्रोह वाटत तर केसेस दाखल करा ना. तुमच्या हातात सत्ता आहे. करा केसेस दाखल, असे खुले आव्हान विधानसभेतील विराेधाी पक्षनेते अजित पवार यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षकच म्हणा. ते धर्मवीर नव्हते, असे विधान राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. अजित पवार यांचे हे विधान द्रोह असल्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यावर अजित पवार यांनी थेट फडणवीस यांनाच खुले आव्हान दिले आहे. मी माझ्या भूमिकेशी ठाम असतो. तुम्ही जेव्हा भारतीय नागरिक असता तेव्हा कायद्याचं पालन केले पाहिजे. हे करताना प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. विचार स्वातंत्र्य आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मी जी काही भूमिका मांडली पाहिजे ती सर्वांना पटावी असे माझे म्हणणे नाही. पण माझी भूमिका चुकीची आहे हे तुम्ही ठरवणारे कोण?असा सवाल त्यांनी फडणवीस आणि भाजपला केला.
मी माफी मागावी असे सांगितले जात आहे. मी असा काय गुन्हा केला? अपशब्दही वापरला नाही. राज्यपाल, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांनी बेताल वक्तव्ये केली. अपशब्द वापरले. जे शब्द वापरायला नको होते ते शब्द सत्ताधाऱ्यांनी वापरले. जिवात जीव असेपर्यंत छत्रपतींच्या विचारांशी आम्ही द्रोह करणार नाही. आमच्याकडून तसे घडणारही नाही. आमच्या दहा पिढ्याही तसे करणार नाहीत, असेही पवार म्हणाले.
भाजप हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे मांडत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीनेही आक्रमक होण्याचा निर्णय घेतला का? असा सवाल केला असता अजितदादांनी थेट पक्षाचीच भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीची स्थापनाच मुळी स्वाभिमानातून झाली आहे. पहिल्यापासून आम्ही पुरोगामी विचार मानणारे आहोत. आम्ही काँग्रेसमध्ये होतो तेव्हा काँग्रेसचा विचारही सर्वधर्मसमभावाचा होता. दोन्ही पक्ष वेगळे झाले तरी पुरोगामीत्वाची कास घेऊन त्याच दिशेने आम्ही काम करत आहोत, असे पवार म्हणाले.
स्वराज्यरक्षक उल्लेखाचे वाहनांवर स्टिकर
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक उल्लेख असलेले स्टिकर वाहनांवर लावले आहेत. संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर शुक्रवारी पहिल्यांदाच अजित पवार पुण्यात आल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. राष्ट्रवादीच्या वतीने संभाजी महाराजांचा स्वराज्यरक्षक उल्लेख असणारे स्टिकर्स छापण्यात आले आहेत. प्रत्येक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या गाडीवर हे स्टिकर्स लावण्यात येणार आहेत. अजित पवार यांनी एका गाडीला स्टिकर लावले आणि बाकी कार्यकर्त्यांना स्टिकरचे वाटपही केले. हे स्टिकर्स पक्षाचे आजी माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाटण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते त्यांच्या वाहनांवर, घरांवर आणि इतर ठिकाणी लावणार आहेत. त्याचबरोबर महापालिकेसाठी इच्छुक उमेदवारांनाही मतदारांपर्यंत हे स्टिकर्स पोहोचवण्यासाठी देण्यात येणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.