आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘म्हाडा’त नोकरी हवी असल्यास सिव्हिल इंजिनीअर पदासाठी 30 लाख तर ज्युनिअर क्लर्क पदासाठी 12 लाख रुपये लागतील, अशी मागणी अॅड. विजय दर्जी याने उमेदवारांकडे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बुधवारी ही खळबळजनक माहिती पुणे सायबर पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयास दिली. अॅड. दर्जीची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
अॅड दर्जी याला पोलिसांनी 26 मे रोजी जळगावातून अटक केली होती. म्हाडा पेपरफुटी प्रकरणात अटकेत असलेला संशयित राजेंद्र सानपच्या संपर्कात दर्जी असल्याचे तपासात आढळून आल्यानंतर त्याला अटक केली. सहा दिवसांची पोलिस पोलिस कोठडीत संपल्यानंतर दर्जी याला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.
कोठडी दरम्यान, पोलिसांनी अनेक खळबळजनक माहिती दर्जीकडून घेतली आहे. यात सानपसह आणखी काही संशयित व उमेदवार यांच्या संपर्कात दर्जी होता. त्याच्याकडे म्हाडा व आरोग्य विभागाच्या परीक्षेचे प्रत्येकी एका उमेदवाराचे हॉल तिकीट सापडले आहे. ते त्याने सानपला पाठवले होते.
दर्जीने बालाजी जॉब प्लेसमेंट या कार्यालयातून म्हाडाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना फोन केले आहेत. त्यांना जळगावात बोलावून घेतले, सिव्हिल इंजिनीअर पदासाठी 30 लाख तर ज्युनिअर क्लर्क पदासाठी 12 लाख रुपये लागतील, असे त्याने उमेदवारांना सांगितले. यानंतर दर्जीसह त्याचा भाऊ पदमाकर दर्जी याने उमेदवारांचे हॉल तिकीट सानपला पाठवले. या शिवाय इतर विभागांचे हॉल तिकीटही दर्जी बंधुकडे सापडले आहेत. या विभागांच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका गैरमार्गाने मिळवून विद्यार्थ्यांकडून पैसे उकळल्याचाही पोलिसांना संशय आहे. अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेत गुण वाढवून देण्याचे आमिष देऊन पैसे घेतल्याचाही संशय आहे. या कारणांसाठी दर्जीला आणखी तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी सरकार पक्षाने न्यायालयात केली. सुनावणीअंती न्यायालयात दर्जीला न्यायालयीन कोठडीत देऊन त्याची कारागृहात रवानगी केली.
गुन्ह्याची व्याप्ती वाढणार
पुण्यात म्हाडा, आरोग्य व टीईटी परीक्षांच्या घोटाळ्याचे गुन्हे दाखल असून त्यात जळगावातील दर्जीला पहिल्यांदाच अटक झाली आहे. जिल्ह्यातील अनेक उमेदवारांची नावे आता पोलिसांकडे आहेत. त्यांची चौकशी झाल्यानंतर या गुन्ह्यात आणखी नवीन संशयित समोर येण्याची शक्यता आहे. म्हणजेच जळगावात या गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.