आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र; वैद्यकीय विभागाची तिघांवर कारवाई

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार इंदापूर पोलिस व वैद्यकीय विभागाने उघडकीस आणला आहे. इंदापूर परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांच्याकडून मोटार आणि गर्भलिंग निदान संबंधी सर्व यंत्रणा जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी प्रवीण पोपटराव देशमुख (३२), तौसिफ अहमद शेख (२०, रा. दोघे रा. राजळे, जि. सातारा) तसेच इतर एकाविरोधात गर्भधारणापूर्व, प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) १९९४ च्या सुधारित २००३ कायद्यान्वये ही कार्यवाही केली. देशमुख एका रोगनिदान केंद्रात तंत्रज्ञ आहे. मोटारीत गर्भलिंग निदान केंद्र चालवले जात असल्याची माहिती इंदापूरच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संतोष खामकर यांना मिळाली. त्यानंतर डाॅ. खामकर तसेच डाॅ. एकनाथ चंदनशिवे, डाॅ. श्रीकृष्ण खरमाटे, डाॅ. अमोल खनावरे यांनी पोलिसांना माहिती दिली.

वैद्यकीयतज्ज्ञ आणि पोलिसांच्या पथकाने मोटारीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. इंदापूर-अकलूज रस्त्यावर दुचाकीवरून दांपत्य आले. दांपत्य मोटारीत बसले आणि मोटार भरधाव वेगाने निघाली. भांडगाव परिसरात एका ओढ्याजवळ मोटार थांबली. पोलिस आणि वैद्यकीय पथक तेथे पोहोचले. मोटारीची तपासणी केली असता मोटारीत बेकायदा गर्भलिंग निदान केंद्र चालवले जात असल्याचे दिसून आले. मोटारचालक शेख, देशमुख तसेच पत्नीची गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी आलेल्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...