आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

विसर्जन सोहळा:'दगडूशेठ' च्या श्रीं चे मुख्य मंदिरामध्ये गणेश कुंडामध्ये विसर्जन; कोरोनाचेही विसर्जन व्हावे, अशी केली प्रार्थना

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... निर्विघ्न या... अशी प्रार्थना करीत सनई चौघड्यांच्या गजरात दगडू शेठच्या श्रीं चे मंदिरात साकारलेल्या गणेश कुंडात विसर्जन करण्यात आले. मंगळवारी अनंत चतुर्दशीला तिन्हीसांजेला सायंकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी श्रीं चे विसर्जन ट्रस्टच्या मोजक्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२८ व्या वर्षी उत्सवात इतिहासात पहिल्यांदाच श्रीं चे विसर्जन व उत्सवाची सांगता मुख्य मंदिरात झाली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, माणिक चव्हाण, हेमंत रासने, प्रकाश चव्हाण यांसह पोलीस दलातील अधिकारी देखील उपस्थित होते. प्रख्यात सनई वादक प्रमोद गायकवाड व नम्रता गायकवाड यांनी गणरायाचरणी वादनसेवा अर्पण केली. तर, प्रभात बँडच्या मोजक्या वादकांनी सादरीकरण केले.

मंगळवारी सायंकाळी ५ वाजता ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांच्या हस्ते महाअभिषेक झाला. अभिषेकानंतर श्रीं ची मंगलआरती करण्यात आली. त्यानंतर गणेश कुंडामध्ये ट्रस्टच्या पदाधिका-यांच्या उपस्थितीत श्रीं चे विसर्जन झाले. हजारो गणेशभक्तांनी हा सोहळा आॅनलाईन पद्धतीने अनुभविला. लेकरांनो, तुमच्यावरचं संकट घेऊन चाललोय... असे सांगणारी आकर्षक रंगावली मंदिरात काढण्यात आली होती. गणेशाने कोरोनारुपी राक्षसाचा वध केल्याचे दृश्यही रंगावलीत साकारण्यात आले होते. दरम्यान गणेशोत्सव काळात आॅनलाईन पद्धतीने सुमारे दीड कोटी भाविकांनी दर्शन घेतले आहे, असे गोडसे यांनी सांगितले.

0